ED Action saeed khan : सईद खान यांची ३.७५ कोटींची मालमत्ता जप्‍त झाल्याने, खासदार भावना गवळी अडचणीत | पुढारी

ED Action saeed khan : सईद खान यांची ३.७५ कोटींची मालमत्ता जप्‍त झाल्याने, खासदार भावना गवळी अडचणीत

वाशिम/परभणी : पुढारी वृत्तसेवा

ED Action saeed khan : खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान याची ३.७५ कोटीची मालमत्ता ईडीने गुरूवारी जप्‍त केली. खान हा गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व अन्य संस्थांच्या आर्थिक कारभारावर लक्ष ठेवत होता. काही दिवसापूर्वीच ईडीने त्यालाा अटकही केली आहे.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये ईडीला १७ कोटींची अनियमितता दिसून आली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच ईडीने खान त्याला ताब्यात घेतले होते. खान हा मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी आहे.

ED Action saeed khan : खासदार गवळी यांच्या संपर्कात आल्यापासून संपत्तीत वाढ

भावना गवळी यांच्या संपर्कात आल्यानंतर कंत्राटाच्या माध्यमातून त्याने मोठी संपती जमा केली असून, या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर ईडीचे पथक पाथरी येथे काही दिवसापूर्वी चौकशीसाठी आले होते. त्यानंतर पथकाने वाशिम येथे चौकशी करीत सईद खान यास मुंबईतून अटक केली होती.

भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशीही झाली. विशेषत: गवळी यांनी स्थापन केलेल्या संस्था ईडीच्या रडावर होत्या.

गवळी या १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

ईडीकडून गवळी यांनाही समन्स बजावले

ईडीने गवळी यांनाही समन्स बजावले असून, त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदत मागवून घेतली आहे.

कोण आहे सईद खान?

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील रहिवासी असलेला सईद खान हा मोठा कंत्राटदार आहे. तो गवळी यांचे निकटवर्तीय मानला जातो. कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला.

खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केली असल्याचं बोललं जातं.

ईडीनं तूर्त गवळी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही.

मात्र, खान याच्या अटकेनंतर गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किरीट सोमय्या यांचं सूचक ट्वीट

सईद खान यांना अटक होताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.

‘वाशिम इथं मला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टरमाइंडला ईडीनं आज पहाटे अटक केली आहे,’ असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Back to top button