लासुरस्टेशन, पुढारी वृत्त्तसेवा : मराठवाड्याची दुष्काळी ओळख आता मिटली पाहिजे म्हणून मराठवाड्यासाठी आम्ही जल आराखडे तयार करून अनेक प्रकल्प मंजूर केले. गोदावरीच्या खोर्यात पाणी आणण्याचे काम केले. मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही असा विश्वास व्यक्त करून मराठवाड्याचे पळवलेले हक्काचे पाणी परत मराठवाड्याला कृष्णा खोर्यातून आणून देण्याचे काम या सरकारने केले. हे पाणी येत्या दीड वर्षात येथे पोहचेल, असे प्रतिपादन प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संबंधित बातम्या
लासूरस्टेशन जवळील आरापूर येथे गुरुवारी (दि.11) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार प्रशांत बंब यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या तब्बल 693 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीतील लखमापूर ते सुलतानाबाद या गंगापूर ब्रह्मगव्हाण उपसा जल सिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे,माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, जलसंपदा सचिव दीपक कपूर, मुख्य अभियंता विजय घोगरे,भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खांबायते, सुहास शिरसाठ, शिवनाथ मालकर, अमोल जाधव,तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
आमदार प्रशांत बंब म्हणाले, की 2015 मध्ये जल आराखडा तयार केला. 165 टीएमसी पाणी गोदापात्रात वाहून जाणारे पाणी जायकवाडीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि पाणी आणले तसेच तत्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या प्रयत्नाने बजाज फाउंडेशनकडून सीएसआरचा मोठा निधी मतदारसंघात मिळाला . त्यातून मोठ्या प्रमाणात खोलीकरणाची कामे करण्यात आली.
दुष्काळात चारा छावणी सुरू केली. कोविड मध्ये नऊ दिवसांत सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर सुरू केले ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गंगापूर उपसा जलसिंचन योजना मंजूर केली. पाऊस पडला नाही तरी शेतकर्यांना 12 महिने पाणी घेऊन शेती करता येईल अशी योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर केली आहे त्यामुळे चाळीस गावांतील शेतकर्यांना ही उपसा जलसिंचन योजना वरदान ठरणार असल्याचेही आ.बंब म्हणाले.
जल आराखड्यात तालुक्यांचा समावेश
आमदार प्रशांत बंब म्हणाले, की आपण देशाला शेतीप्रधान देश म्हणतो. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम जर काही काम करायला पाहिजे होते तर प्रत्येक शेतकर्याच्या बांधापर्यंत अधिकच पडणारा पाणी नेऊन द्यायला पाहिजे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा जल आराखडा तयार केला. त्यात आपल्या तालुक्यांतील योजनांचा देखील समावेश केला असे सांगत शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्याचे आपण काम करत असल्याचे आमदार बंब म्हणाले.
ठिबक सिंचनातून पाणीपुरवठा करणारी योजना शेतकर्यांना थेट त्यांच्या शेतात ठिबक सिंचनातून पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना आ. प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणली. ही योजना शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे. गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून चाळीस गावांतील शेतकर्यांच्या बांधा पर्यंत पाणी पोहचणार आहे.
सिंचनाची सुविधे बरोबर सिंचन उपसा प्रकल्पाला लागणारी वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार प्रकल्प मंजूर करून देणार आहे . आज खर्या अर्थाने जय किसानचा नारा देणारा कार्यक्रम असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( दुष्काळी ओळख )