वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : शेकडो जेसीबीमधून होणारी पुष्पवृष्टी यावर मंत्री भुजबळ यांनी टीका केली आहे यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, त्याला फक्त फुले आणि जेसीबीच दिसते काय? त्याला आरक्षण दिसत नाही का? त्याला आरक्षण पण दिसू दे ना. तुझे डोळे गेले काय? असा संतप्त सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला. Manoj Jarange Patil
पुढे बोलताना ते म्हणाले की, पोरांना आरक्षण देण्याचे त्यांनी बघावे. त्यांना आयुष्याची भाकरी मिळावी म्हणून ते आनंदाने जेसीबी आणतात. तुला त्या जेसीबीच दिसतात का? समाजाला ७० वर्षापासून आरक्षण नाही, ते पण दिसू दे ना. खातो तर खातो आणि बुडाखाली घेऊन बसलाय आमचे आरक्षण. तुझे काय डोळे गेलेत काय? तुला दिसेना का पोरं त्रासाने वेदना सहन करत आहेत ते. तुला हे पण दिसू दे ना, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे- पाटील यांचा समाचार घेतला. Manoj Jarange Patil
जालना येथील विराट सभेला निघण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे- पाटील बोलत होते.
चौथ्या टप्प्यातील दौरा हा खानदेशात तसेच उत्तर महाराष्ट्रात होत आहे. या दौऱ्या दरम्यान कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मग सरकार बघेल ना. कायदा- सुव्यवस्था बिघडवायची आणि मंत्री पदाचा गैरवापर करायचा, एवढेच काम सध्या ते करत आहेत, असा टोला भुजबळांना लगावला. मात्र, आम्ही त्या भागात जाऊन तेथे शांततेचे आव्हान करू. आज जालन्यात १५० जेसीबीद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि शक्ती प्रदर्शन असे काही नाही. आम्ही एकमेकांशी संवाद साधायला जातोय. आमच्या समाजाच्या पोरांना न्याय मिळावा, लेकरांचे कल्याण व्हावे, यासाठी फिरतोय.
आजच्या सभेवर पावसाचे सावट नसून तो निसर्गाचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. मराठा खूप तापलेला आहे. आता तापून द्यायचा नाही. निसर्गाने आमच्यावर कृपा केली. ऊन लागले नाही पाहिजे, आतापर्यंत खूप उन्हात ठेवला मराठा समाज. चारही बाजूने आग लागली. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा