तुम्ही मराठा समाजाला तोडले; जातीय तेढ निर्माण करू नका : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

तुम्ही मराठा समाजाला तोडले; जातीय तेढ निर्माण करू नका : मनोज जरांगे-पाटील

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करून कुणबी प्रमाणपत्र स्थगित करावे, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली असून त्यास प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे-पाटील यांनी भुजबळ हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी बोलत आहेत, असा पलटवार केला. तुम्ही मराठा समाजाला ओबीसींपासून तोडले, आता जोडण्याची भाषा करत आहात, जातीय तेढ निर्माण करू नका, असे जरांगे-पाटील म्हणाले.

दरम्यान, जरांगे यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या कायदेशीर आणि शासकीय कुणबी नोंदी आढळून येत आहेत. त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला ओबीसी आरक्षण मिळणारच आहे. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही, असे जरांगे म्हणाले. वय झाल्यामुळे भुजबळ असे बोलतात. त्यांचे केस पांढरे होऊन काहीही उपयोग नाही. त्यांची आंदोलने अशीच असतात. ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेले. मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नाहीत, असा माझा त्यांना सवाल आहे.

डॉक्टरांनी जरांगे यांच्या सर्व तपासण्या करून त्यांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते पुढील दोन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. रविवारी त्यांनी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनातील निष्पापांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असा शब्द सरकारने दिला होता. मात्र, आता साखळी उपोषण करणार्‍यांना नोटिसा आणि अंतरवाली सराटीतील लोकांना अटक करून दहशत निर्माण केली जात आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नोटिसांचे हे दबावतंत्र बंद करावे, अशी आपली मागणी आहे. मराठा समाजात रोष असल्यामुळे सरकारने आमच्याशी दगाफटका करू नये.

24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. तोपर्यंत समाज बांधवांनी शांतता पाळावी, असे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले.?

Back to top button