छत्रपती संभाजीनगर शहरात एकच दिवशी आगीच्या आठ घटना | पुढारी

छत्रपती संभाजीनगर शहरात एकच दिवशी आगीच्या आठ घटना

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शहरवासीय उत्साहात दिवाळी साजरी करीत असताना दुसरीकडे शहरात आठ ते दहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. कुठे बंद फ्लॅटमध्ये तर कुठे मोकळ्या मैदानात आग लागली. सातारा परिसरात एका शाळेत तर चिकलठाणा आणि नक्षत्रवाडी भागात फ्लॅटमध्ये आग लागल्याचे समोर आले. यात सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. प्रत्येक ठिकाणी ५० हजार ते १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या 

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाणा विमानतळासमोरील एका अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. हा फ्लॅट बंद असल्यामुळे मोठी हानी झाली नाही. केवळ काही घरातील कपडे जळाले. चिकलठाणा भागातील रत्नप्रभा मोटर्सजवळ एका डीपीला आग लागली होती. तसेच पुंडलिकनगर भागात एका भांड्याच्या दुकानाला आग लागली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठे नुकसान टळले. दिवाण देवडीतही एका दुकानाला आग लागली.

सातारा परिसरमधील न्यू इंग्लिश स्कूलला आग लागल्याचे समोर आले. ही आग खूपच मोठी होती. एक बंब आणि एक टँकर आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण केले होतं. काही वेळात ही आग आटोक्यात आणली. यानंतर लाभ चेंबरजवळ जनरेटरला आग लागली होती. तसेच पाणचक्कीजवळील गार्डन परिसरात चारा जळाला. महत्वाचे म्हणजे, नक्षत्रवाडी साई नक्षत्र अपार्टमेंटमधील सहाव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये आग लागली होती. सिलिंडर लिकेजमुळे ही आग लागली असावी, असे सांगितले जात आहे.

Back to top button