Maratha Aarakshan : सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी | पुढारी

Maratha Aarakshan : सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी (दि. 2) अंतरवाली सराटीत येणार आहे. त्यांच्याशी शेवटची चर्चा होणार आहे. या शिष्टमंडळाला कोणीही आडवे येणार नाही, असा शब्द दिला आहे, असे उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सायंकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

तत्पूर्वी, आमदार बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेऊन गावकर्‍यांच्या शिष्टमंडळाशीही चर्चा केली. प्रहार संघटनेचे नेते,
आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी सायंकाळी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली आणि त्यानंतर जरांगे-पाटील यांनी निवडलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. तेथूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी न बोलता ‘उद्या येतो,’ असे सांगून निघून गेले.

जरांगे-पाटील म्हणाले की, आमदार कडू यांनी राजकारणापलीकडे जाऊन पाठिंबा दिला आहे. म्हणून त्यांना व्यासपीठावर येऊ दिले; अन्यथा आपल्या व्यासपीठावर राजकारण्यांना बंदी आहे.

जरांगे-पाटील यांचे तीन प्रश्न

जरांगे-पाटील म्हणाले, बच्चू कडू यांच्या माध्यमातून सरकारला तीन प्रश्न विचारले. 1) महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देत नाही. 2) सरकारला वेळ कशासाठी पाहिजे आणि 3) कशा स्वरूपाचे आरक्षण देणार. उद्या यावर शेवटची चर्चा होईल. सरकारने वेळ मागितला, त्याबाबत समाजासोबत बसून चर्चा करू, योग्य वाटले तर दहा-बारा दिवसांचाच वेळ देऊ; पण आरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लावू. वेळ दिला किंवा नाही दिला, तरी हे आंदोलन आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे.

Back to top button