मराठा व धनगर आरक्षणात राज्य- केंद्राने तत्काळ हस्तक्षेप करावा; रत्नाकर गुट्टेंचा आग्रह | पुढारी

मराठा व धनगर आरक्षणात राज्य- केंद्राने तत्काळ हस्तक्षेप करावा; रत्नाकर गुट्टेंचा आग्रह

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठा व धनगर समाज आरक्षणाचे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण बनले आहेत. अशाप्रसंगी जनक्षोभ लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने एकत्रित निर्णय घेऊन याप्रकरणी तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा असा आग्रह गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सोमवारी (दि.३०) एकदिवसीय अन्नत्याग आंदोलनात केला आहे.

संबंधित बातम्या 

आ. रत्नाकर गुट्टे यांनी मराठा व धनगर आरक्षण समर्थनार्थ सोमवारी त्यांच्या निवासस्थानासमोर १ हजार समर्थकांसह अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी बोलताना गुट्टे म्हणाले की, ‘मराठा समाज आरक्षणासाठी अनेकांनी कित्येक वर्ष आंदोलने केली. मराठा समाजाचे आरक्षण ही रास्त मागणी असून ती पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी स्वतःची तब्येत सांभाळून आंदोलन करावे, आमच्यासह अवघा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे.’

तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न हा तांत्रिक स्वरूपावर अडकलेला आहे. सरकारच्या आश्वासनाप्रमाणे धनगर आरक्षण तातडीने मिळण्यासाठी जाहीर पाठिंबा म्हणून मी अन्नत्याग आंदोलन करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

या आंदोलनात आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप अळनुरे, पालम- पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, माजी जि.प.सदस्य गणेशराव रोकडे, बाजार समितीचे माजी सभापती बालासाहेब निरस, उपसभापती संभाजी पोले, मित्रमंडळाचे जिल्हा प्रवक्ता संदीप माटेगावकर आदींसह सुमारे १ हजार समर्थकांनी सहभाग नोंदविला.

 

Back to top button