गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची विजयी पताका कायम ठेवण्यासाठी तसेच आगामी गंगाखेड विधानसभा जिंकण्यासाठी तालुक्यात पक्षसंघटन जोमाने वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी अंग झटकून कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी रविवारी (दि.८) शहरात शिवसैनिकांच्या बैठकीत केले.
परभणी लोकसभेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघाने नेहमीच शिवसेनेला विजयी मताधिक्य दिलेले आहे. हा राजकीय इतिहास आहे. तसेच गंगाखेड विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही क्रमांक २ चे मते मिळवून आमदारकीवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षसंघटन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी शहरात कॉर्नर बैठका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन अंग झटकून लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीला लागावे, असे आवाहन विशाल कदम यांनी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बैठकीत केले. शहरात प्रत्येक प्रभाग व मतदान केंद्र निहाय शिवसेनेचे संघटन वाढवणे अत्यावश्यक आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही गटनिहाय पक्षसंघटन बांधणी करावी. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी सर्वाधिक वेळ देणे गरजेचे असल्याचे कदम यावेळी म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख ॲड.मनोज काकाणी, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे, उपतालुकाप्रमुख धोंडीराम जाधव, गोविंद जाधव, दीपक घोगरे, राजेश सगट, संभाजी पंडित आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
हेही वाचा