

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : शासकीय रुग्णालयात मृतांचे वाढणारे आकडे मन सुन्न करणारे, वेदनादायी असून या घटनेस राज्यातील तीन चाकांचे खोके सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी केला. खा. सुळे या गुरुवार (दि. ५) रोजी नांदेड दौर्यावर आल्या होत्या. त्यांचे दुपारी नांदेड येथे विशेष विमानाने आगमन झाले. विमानतळावरून त्या थेट शासकीय रुग्णालयात पोहचल्या. रुग्णालयातील महिलांचा आक्रोश पाहून त्यांचे मन क्षणभर हेलावले. अधिष्ठाता व अन्य अधिकार्यांशी त्यांनी चर्चा केली.
रुग्णालयातील रुग्णांची भेट आटोपल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, शासकीय रुग्णालयातील चित्र पाहून मन सुन्न झाले असून ही बाब खूप वेदनादायी आहे. ज्या मातेचे मुल दगावले आहे, त्या मातेचा आक्रोश पाहवत नव्हता, इतकी मोठी घटना घडून देखील खोके सरकार अजून जागे झाले नाही. सरकारची ही असंवेदनशीलता, अकार्यक्षमता संतापजनक आहे.
आरोग्य, शिक्षण यावर सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खाजगी विमानाने पालकमंत्री बदलासाठी दिल्लीची वारी करता येते, परंतु त्यांना नांदेडला येण्यासाठी वेळ नाही. सरकारमध्ये थोडीही माणुसकी उरली नाही, अशा शब्दांत खा. सुळे यांनी राज्यातील या सरकारवर हल्लाबोल चढवला. नांदेडच्या घटनेची नैतिकता बाळगून संबंधित विभागाच्या मंत्र्याने तातडीने राजीनामा द्यावा. रुग्णालयातील मृत्यू प्रकरण ही एकप्रकारे खोके सरकारने केलेली हत्याच होय, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अवमान करण्याचा कट एका अदृष्य हाताकडून रचला जात आहे. या अदृष्य हाताने आधी शिवसेना अन् नंतर राष्ट्रवादी फोडली. मराठी माणूस असणाऱ्या देवेंद्रजीचे डिमोशनही केले. मराठी माणसाचा सातत्याने अवमान होत आहे. हा अवमान राष्ट्रवादी कदापि सहन करणार नाही. छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र दिल्लीपुढे कदापि झुकणार नाही. स्वाभिमान गहाण ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीच्या वार्या करत आहेत. आगामी काळात सेवा, सन्मान, स्वाभिमान या त्रिसू- त्रीसाठी राष्ट्रवादी काम करणार असून इंडिया आघाडी मजबूत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
अजितदादा मुख्यमंत्री होवू शकतात, असे विधान अलीकडेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते, या विधानाबाबत बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, अजितदादा पाच वर्ष मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. जर असे झाले तर त्यांना पहिला हार मी घालेल.