नांदेड; पुढारी वृत्तसेवा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मृत्यूकांडाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांची समिती मंगळवारपासून येथे कार्यरत आहे. या समितीच्या चौकशीचा अहवाल गुरुवारी राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. तथापि, या अहवालापूर्वीच वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयातील डॉक्टर्स दोषी नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय (घाटी) रुग्णालयातल्या मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रणिता जोशी आणि औषधशास्त्र विभागाचे डॉ. भारत चव्हाण हे तज्ज्ञ मंगळवारी सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. शासकीय रुग्णालय परिसरात दिवसभर मोठी वर्दळ आणि राजकीय नेत्यांच्या भेटींचे सत्र सुरू असताना ही समिती आपल्या कार्यात मग्न होती, असे सांगण्यात आले.
दरम्यान, या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. रुग्णालयात 1 हजार 585 रुग्णांची बाह्य रुग्ण विभागात नोंद झाली.
दरम्यान, नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आपण राज्यपालांकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.