Beed News : केंद्रीय शाळेला गांधी जयंतीचा विसर | पुढारी

Beed News : केंद्रीय शाळेला गांधी जयंतीचा विसर

अतुल शिनगारे

धारूर : तालुक्यातील आंबेवडगाव येथे केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. सोमवारी (दि. २) गांधी जयंती दिनी सुटी असल्याने शाळेकडे कोणीच फिरकले नाही. अखेर संतप्त युवक व ग्रामस्थांनी बंद शाळेच्या कुलूपाला हार घालून संताप व्यक्त केला. हा प्रकार केंद्रप्रमुख विलास मुळे यांना माहीत होताच त्यांनी दुपारी याच शाळेत शिक्षिका असलेल्या पत्नीला घेऊन येत गांधी जयंती साजरी केली. या प्रकरणी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकाला गटशिक्षणाधिकारी यांनी नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.

धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे पहिली ते पाचवी पर्यंत केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. सतत चर्चेच्या वर्तुळात असलेल्या या शाळेमध्ये दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना मराठी वाचन व पाढे येत नसल्याची चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान गणेश विसर्जन व यानंतर सलग चार- पाच दिवस सुट्या आल्या. परंतु गांधी जयंतीनिमित्त सुटी असली तरी शाळेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी उपस्थित राहून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करणे गरजेचे होते. परंतु आंबेवडगाव येथील शाळेचे कुलूप पाहून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याची बाब पालक शेषनारायण नायकोडे, मारुती नायकोडे, नवनाथ घोळवे, पांडुरंग धुमाक, जय शेरकर, शरद थोरात या पालकांच्या लक्षात आली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वोच्च देणाऱ्या महापुरुषांची जयंती असताना शाळेला लागलेचे कुलूप पाहून गावातील युवक, पालक आणि ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले. बराच- वेळ त्यांनी शाळेत कोणी येत की नाही? याची वाट पाहिली. परंतु दुपारपर्यंत शाळेत कोणीच आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या पालक व युवकांनी ही बाब वरिष्ठांना सांगितली. यावेळी पालकांनी बंद असलेल्या शाळेच्या दरवाजाला हार घालून गांधीगिरी मार्गाने जयंती साजरी केली. दरम्यान ही बाब केंद्रप्रमुख विलास मुळे यांना समजतात त्यांनी या शाळेत आपली पत्नी शिक्षिका असल्यामुळे त्यांना सोबत घेऊन दोघांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले. या साच्या घाई गडबडीत त्यांना लाल बहादूर शास्त्री यांचा विसर पडला.

विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या या प्रतापामुळे पुन्हा एकदा ही शाळा चर्चेत आली असून या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Back to top button