नांदेड: नायगाव, हिमायतनगर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

नांदेड: नायगाव, हिमायतनगर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नरसीफाटा; हिमायतनगर; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ नायगाव बंदची हाक आज (दि.४) देण्यात आली होती. या बंदला शहर, नरसी व संबंध तालुक्यातील परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नायगावसह रामतीर्थ व कुंटूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकल मराठा समाजाच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी चौक ते हेडगेवार चौकापर्यंत मोर्चा काढला. हेडगेवार चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व उपोषणकर्त्या आंदोलकावर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे अशा आशयाचे निवेदन मंडळ अधिकारी इजपवार व पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांना देण्यात आले.

नायगावसह नरसी, गडगा, रातोळी, मांजरम, कुंटूर, घुंगराळा, कुष्णूर व बरबडा परिसरात बंदचा परिणाम जाणवला. या बंदमध्ये माणिक चव्हाण, रणजित देशमुख, पांडुरंग चव्हाण, संदीप पाटील रातोळीकर, प्रा. डॉ. जीवन चव्हाण, रावसाहेब शिंदे, मंगलताई हंबर्डे, प्रताप पाटील सोमठाणकर, चंद्रकांत पवार होटाळकर, साई मोरे देगावकर, राजेश हंबर्डे, बालाजी शिंदे, संजय चव्हाण यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकल मराठा समाजाने दिलेल्या नरसी बंदच्या हाकेला प्रचंड प्रतिसाद देत व्यापा-यांनी आपआपली प्रतिष्ठाने, दुकाने कडकडीत बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामतिर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी आपल्या फौजफाट्यासह तगडा बंदोबस्त ठेवला होता.

हिमायतनगर तालुक्यात सकल मराठा समाजाकडून भव्य मोर्चा

मराठा समाजाला ओबीसी वगळता वेगळे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर शहरातून भव्य मोर्चा काढला. हा मोर्चा हिमायतनगर शहरातील ग्रामदैवत परमेश्वर मंदिरासमोरून पोलीस स्टेशन चौपाटी भागातून परत परमेश्वर मंदिरासमोर येऊन सभेत रूपांतर झाले.

यावेळी हिमायतनगर तहसीलचे नायब तहसीलदार हराळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात सकल मराठा समाजाचे सर्व पक्षीय जेष्ठ कार्यकर्ते, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button