आंदोलकांवर गोळ्या झाडायला हे मोगल, निजामाचे राज्य आहे का? : संभाजीराजे | पुढारी

आंदोलकांवर गोळ्या झाडायला हे मोगल, निजामाचे राज्य आहे का? : संभाजीराजे

जालना, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसर्‍या बाजूला आंदोलकांवर गोळ्या झाडता. हे काय मोगलाचे, निजामाचे राज्य आहे का? मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला, असे सांगत संभाजीराजे यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमाराचे आदेश देणार्‍याचे निलंबन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शनिवारी दिला.

संभाजीराजे यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी गावाला भेट दिली व आंदोलकांशी चर्चा केली. तसेच जखमींची विचारपूस केली. त्यावेळी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, काल जालन्यात सरकारच्या माध्यमातून हे अमानुष कृत्य घडवण्यात आले. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज म्हणून इथे आलो आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याने मी अनेक दिवसांपासून लढत आहे. 2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे; पण काल जे घडले ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य घडवल्याचे संभाजीराजे म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या राज्यात असे होत असल्याची खंत व्यक्त करीत संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसर्‍या बाजूला आंदोलकांवर गोळ्या झाडता. आंदोलकांवर गोळ्या घालायला हे काय पाकिस्तानचे लोक आहेत का? ते काय दहशतवादी आहेत का? हे काय मोगलांचे, निजामांचे राज्य आहे का? असे जर होत असेल तर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतो की, मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी संभाजीराजेंवर घाला. जर आंदोलकांवरचे गुन्हे सरकारने मागे घेतले नाहीत आणि ज्या माणसाने हे कृत्य करण्याचे आदेश दिले त्याचे निलंबन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. निलंबन हा एक भाग झाला. याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असेही ते म्हणाले.

Back to top button