सप्टेंबर महिन्यात विविध ९ सण; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल | पुढारी

सप्टेंबर महिन्यात विविध ९ सण; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा: पुढील सप्टेंबर महिन्यात विविध ९ धार्मिक सणाचे रेलचेल राहणार आहे. त्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, ज्येष्ठ गौरी,  जैन समाज पर्युषण पर्व, ईद ए मिलाद आदीसह विविध सण व सार्वजनिक महोत्सव एकत्र आले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असून विविध धार्मिक ठिकाणी भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

सप्टेंबर महिन्यात ६ सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी तर ७ सप्टेंबररोजी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबररोजी शेतकरी बांधव पोळा सण साजरा करतात. या दिवशी बैलजोडीची सजावट करून मिरवणूक व पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.

तर १८ सप्टेंबररोजी महिलांचा सर्वात मोठा सण हरितालिका आहे. १९ सप्टेंबररोजी गणेश चतुर्थी, या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सलग १० दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांची रेलचेल असते. तर २० सप्टेंबररोजी ऋषी पंचमी आहे. या दिवशी जैन बांधवाचा पवित्र पर्युषण पर्व कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. सलग १० दिवस जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

तर २१ सप्टेंबररोजी घरोघरी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते. तर २२ सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी पूजन तर २३ सप्टेंबररोजी घरोघरी विविध कार्यक्रम असणार आहेत. तर २८ सप्टेंबररोजी अनंत चतुर्थी असून गणरायास निरोप देण्यात येणार आहे. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास १० विविध धार्मिक सण आले आहेत. तर शासकीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात जवळपास ८ दिवस सुट्टीची मेजवानी मिळणार आहे. विविध सण एकाच महिन्यात आल्याने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

हेही वाचा 

Back to top button