Ganeshotsav 2023: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसेस फुल्ल; २०८५ बसेसचे बुकिंग | पुढारी

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसेस फुल्ल; २०८५ बसेसचे बुकिंग

जयंत धुळप

रायगड: कोकणवासीयांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायांचे आगमन येत्या १९ सप्टेंबररोजी होत आहे. गणेशोत्सवाकरिता कोकणातील आपापल्या गावी जाण्याचे नियोजन चाकरमन्यांचे गेल्या महिन्यातच झाले आहे. तर या सर्व चाकरमान्यांना कोकणात घेऊन जाण्याकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षी प्रमाणे तब्बल ३ हजार एसटी बसेस सज्ज केल्या आहेत. यातील १२२० एसटी बसेसचे ग्रुप बुकिंग तर ८६५ बसेसचे आरक्षण अशा एकूण २०८५ बसेस आत्ताच फुल्ल झाल्या आहेत. दरम्यान आणखी बसेसची गरज भासल्याल अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुत्रांनी दिली आहे. (Ganeshotsav 2023)

आगाऊ बुकिंग झालेल्या या २०८५ बसेसपैकी ८०१ मुंबईतून, पालघर मधून ५३० आणि ठाणे जिल्ह्यातून ७५४ बसेस सूटणार आहेत. बुकिंग झालेल्या २०८५ बसेस पैकी १५ सप्टेंबररोजी ६१ बसेस सुटणार आहेत. शनिवार १६ सप्टेंबररोजी १३३९, रविवार १७
सप्टेंबररोजी ४१८, सोमवार १८ सप्टेंबर रोजी १६३ बसेस रवाना होणार आहेत. या बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, ठाणे- १, ठाणे- २, विठ्ठलवाडी, कल्याण, नालासोपारा, वसई, अर्नाळ आगाराच्या विविध ठिकाणांहून सुटणार आहेत. सद्यस्थितीतील ३ हजार एसटी बसेसच्या सेवेकरिता मुंबई प्रदेश एसटी विभागाच्या ६७५, पुणे विभागाच्या ७५०, संभाजीनगर विभागाच्या ७००, नाशिक विभागाच्या ६५० तर अमरावती विभागाच्या ५० बसेसचा समावेश आहे. उर्वरित बसेस अन्य विभागातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Ganeshotsav 2023: गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर विशेष दुरुस्ती पथके

मुंबई गोवा महामार्गाच्या सुरु असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम, अनेक ठिकाणी असणारे खड्डे आणि वळण मार्ग या पार्श्वभूमीवर एसटी बसेसचे टायर फुटणे, नादुरुस्त होणे, अशा समस्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, या करिता नादुरुस्त एसटी बस तत्काळ दुरुस्त करण्याकरिता गोवा महामार्गावर एकूण सहा विशेष दुरुस्ती पथके सज्ज करण्यात आली आहेत. मुंबई विभागांतर्गत कुर्ला ते पनवेल टप्प्याकरिता कोकणभवन येथे हे पथक असेल. त्यापुढील मार्गात ठाणे विभागांतर्गत रामवाडी ते कोलाड टप्प्याकरिता वाकणफाटा, रायगड विभागांतर्गत कोलाड ते पोलादपूर करिता लोणेरेफाटा, पोलादपूर ते चिपळूण करिता कशेडी, रत्नागिरीत चिपळूण ते राजापूर करिता संगनेश्वर तर सिंधुदुर्गात राजापूर ते सावंतवाडी करिता तरळा येथे दुरुस्ती पथक तैनात करण्यात येत आहेत.

हेही वाचा 

Back to top button