पुढारी ऑनलाइन डेस्क; छत्रपती संभाजीनगर : Kala Chabutara : भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या संग्रामाची म्हणजेच १८५७ च्या उठावाचा इतिहास आणि आठवणी करुन देणारे स्मारक म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील 'काला चबुतरा' होय. या ठिकाणी इंग्रजांनी २४ क्रांतिकारकांची निर्दयी हत्या केली होती. यामुळे त्या काळी भीतीदायक वाटणारी ही जागा आज देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देत आहे.
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटी विरोधात देशात १८५७ मध्ये अभूतपूर्व उठाव झाला. यात तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्यापर्यंत अनेकांनी सहभाग घेत योगदान दिले. या संदर्भात इतिहासातील नोंदीनुसार तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजी फौजेतील हिंदु तुकडी आणि मुस्लिम तुकडी यांच्यामध्ये इंग्रजांविरोधात विद्रोह करण्याची प्रेरणा निर्माण केली. निजामाचे सैनिक देखील क्रांतीकारकांना आतून मिळालेले होते. याचा सुगावा इंग्रजांना लागला होता. त्यामुळे नाशिकवरुन कॅप्टन अॅबट तर, अहमदनगरवरुन कॅप्टन वुडबर्न हे दोन्ही सैन्यासह छत्रपती संभाजीनगरला पोहोचले.
सैन्य छावणीत पोहोचताच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील नियुक्त सर्व सैनिकांना शस्त्र खाली ठेवण्याचे फर्मान सोडले आणि बंडखोर सैनिकांच्या नावाचा पुकारा करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैनिक मीर फिदा अलीने कॅप्टन अॅबटवर बंदुकीची गोळी झाडली, पण नेम चुकल्याने तो वाचला. या घटनेनंतर क्रांतिकारकांवर खटले चालवून, २४ जून १८५७ रोजी तिघांना तोफेच्या तोंडी तर, २१ क्रांतिकारकांना फासावर लटकवण्यात आले होते. पुढे याच सैनिकांचे स्मारक 'काला चबुतरा' या नावाने क्रांती चौकात उभारण्यात आले.
मीर फिदा अली, मोदी खान, शेख रहीम, जानबाज खान, मोहम्मद मिर्झा खान, शेख फत्ते मोहंमद, मोहम्मद सालेर, दिलावर खान, शेख हुसेन, मिर्झा अजीम बेग, हुसेन खान, शेख मलिक, अहमद खान, मीर मजहर अली, नूर खान, मीर ईनाम अली, अब्दुल्लाह खान, मोहम्मद मीर खान, मीर बादर अली, फैज मोहम्मद यांनी १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात बलिदान दिल्याची नोंद आहे.
स्वातंत्र्य युद्धाच्या या स्मृतीनिमित्त या चौकात झाशीच्या राणीचा पुतळा नगर परिषदेच्या वतीने बसवण्यात आला. नंतर २०१७ मध्ये या ठिकाणी जागेचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करुन २१० फूट उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. सध्या ही जागा शहरातील हार्ड आॅफ सिटी आणि पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण बनली आहे.
हे ही वाचा :
काला चबुतरा 01,02 ; क्रांती चौकातील काला चबुतरा १८५७ च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या संग्रामाची आठवण करुन देणारे स्मारक आहे.