Parbhani news : चार रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार; पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी पायाभरणी

Parbhani news : चार रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार; पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी पायाभरणी


सेलू : देशातील 508 रेल्वे स्थानकांचे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, पुनर्विकास पायाभरणी समारंभ रविवारी (दि. 6) सकाळी 9 वाजता संपन्न होत आहे. यात परभणी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचा समावेश असून चारही रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे 508 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास कामासाठी पायाभरणी समारंभ होणार आहे. (Parbhani news)

यावेळी केंद्रीय रेल्वे, दळणवळण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, दर्शना जरदोष यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. सेलू रेल्वे स्थानक परिसरात यासाठी 50 बाय 150 चा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. यात 2 हजार नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने शहरातील अडीच हजार नागरिकांना निमंत्रण पत्रिका देण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वेचे नोडल ऑफिसर हेमा नाईक यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली. (Parbhani news)

यावेळी समारंभाच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांचे मनोगत होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मनोगत व्यक्त होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली आहे.

Parbhani news : चार रेल्वे स्थानकांचा समावेश

परभणी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करत असताना येथे चल पायरी म्हणजेच एक्सलेटर उभारण्यात येणार आहे. तर उर्वरित सेलू , पूर्णा, गंगाखेड येथे लिफ्ट उभारण्यात येणार आहे. सदरील चार रेल्वे स्थानक यापुढे सुशोभित, स्वच्छ व परिपूर्ण होणार आहेत. यामुळे परिसरातील रेल्वे प्रवाशी व नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी सेलू शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनारायण मालाणी यांनी केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news