हिंगोली : जलकुंभाच्या खड्डयात पडून ६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा – सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी उभारल्या जाणाऱ्या जलकुंभाच्या खड्डयात पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोषी यातळकर असे चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी गावालगत असलेल्या फलाटवाडी भागात जलकुंभ उभारणीची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र खड्डे खोदकाम केल्यानंतर खाली तांबारी माती लागल्यामुळे जागा बदलण्यात आली. मात्र या ठिकाणी असलेला खड्डा बुजविण्यात आला नाही.
मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे. दरम्यान, या भागात राहणारी आरोषी यातळकर शुक्रवारी दुपारी चार वाजता खेळण्यासाठी गेली अन् त्या खड्ड्यात पडली. सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. मात्र, रात्रीच्या सुमारास खड्डयामधील पाण्यात तिच्या चपला तरंगताना दिसल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी पाण्यात तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, आरोषी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आरोषी ही तिच्या आई व लहान बहिणीसोबत आजोबांकडे राहत होती. तिच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या ठिकाणी असलेला खड्डा बुजविण्याची मागणी कंत्राटदार व ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र त्यानंतरही खड्डा बुजविण्यात आला नाही. चिमुकलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे.