Sahasrkund waterfall : पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित | पुढारी

Sahasrkund waterfall : पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित

नांदेड, विश्वास गुंडावार : मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवर असलेला सुप्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रवाहित झाला आहे. यंदा पावसाळा लांबल्याने धबधब्याला महिनाभर उशिराने पाणी आले असून, पर्यटक विहंगम दृश्य पाहण्यास गर्दी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरपासून 15 किमी, तर इस्लापूर येथून पाच किमी अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत असतो. मोठा पाऊस झाल्यानंतर धबधबा प्रवाहित होतो. गतवर्षी जून महिन्यातच धबधबा सुरू झाला होता. यंदा मात्र वरुणराजाने उशिरा हजेरी लावली. सुमारे 100 फुटांवरून कोसळणारा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी मनोर्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय धबधब्याच्या काठावर पुरातनकालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनाचाही दुर्लभ योग येतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटक मोठ्या संख्येने धबधबा पाहण्यासाठी येतात.

इस्लापूर येथील पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. खडकाळ बेटावर अनेक तलाव तयार झाले आहेत, म्हणूनच या धबधब्याला सहस्रकुंड (हजार तलाव) म्हणतात. धबधब्याच्या सभोवतालचा खडकाचा नमुनादेखील मनोरंजक आहे. कारण खडक धातूसारखा दिसतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात उतरण्याचा सल्ला दिला जात नाही. हे ठिकाण पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते, पण पाहण्याची योग्य वेळ पावसाळ्यात असते.

काय पाहाल?

नांदेड शहरापासून इसापूर धरण 90 किमी असून, नांदेडमधील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची 57 मीटर आहे. हे धरण, या भागातील पर्यटनस्थळ अद्वितीय ठिकाण आहे.याशिवाय माहूरगड नांदेड शहरापासून 91 किमी आहे. रेणुकादेवीचे क्षेत्र असलेल्या माहूर येथे एकाच वेळी तीन पर्वत दिसू शकतात. दत्त शिखर, अत्री-अनसूया शिखर तसेच जमदग्नी मंदिर, परशुराम मंदिर, कालिका मंदिर, देवदेवेश्वर मंदिर आणि पांडव लेणी पाहण्यासाख्या आहेत.

Back to top button