Adhik Maas 2023 : तब्बल १९ वर्षांनी शुभसंयोग: यंदा श्रावण २ महिन्यांचा; धार्मिक महत्त्व घ्या जाणून | पुढारी

Adhik Maas 2023 : तब्बल १९ वर्षांनी शुभसंयोग: यंदा श्रावण २ महिन्यांचा; धार्मिक महत्त्व घ्या जाणून

प्रा. रविंद्र जोशी : परळी वैजनाथ

धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भक्तीसाठी अनुकूल व समर्पित समजला जातो. यंदा हा पवित्र पर्वकाळ तब्बल २ महिन्यांचा असणार आहे. तब्बल १९ वर्षांनी असा शुभसंयोग येत आहे. यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल २ महिन्याचा राहणार आहे. यावर्षी ८ श्रावणी सोमवार (Adhik Maas 2023)  येत आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून हा विशेष पर्वकाळ असल्याचे मानले जात आहे.

श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. तर अधिक महिना (Adhik Maas 2023)  हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित आहे. हे दोन्हीही शुभसंयोग यावर्षी श्रावण महिन्यातच आले आहेत. अधिक श्रावण आणि निज श्रावण असे दोन महिने श्रावण पर्वकाळ असणार आहे.

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण ५९ दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. १९ वर्षांनंतर हा शुभ संयोग घडल्याचे सांगितले जात आहे. यावेळी १८ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान अधिकमास असेल. म्हणजेच या वेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबतच भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळणार आहे.

Adhik Maas 2023  : अधिक महिना आणि निज महिन्याचे एकूण ८ श्रावण सोमवार

पहिला सोमवार – २४ जुलै
दुसरा सोमवार – ३१ जुलै
तिसरा सोमवार – ७ ऑगस्ट
चौथा सोमवार – १४ ऑगस्ट
पाचवा सोमवार – २१ ऑगस्ट
सहावा सोमवार – २८ ऑगस्ट
सातवा सोमवार – ४ सप्टेंबर
आठवा सोमवार – ११ सप्टेंबर

ज्योतिषीय गणनेनुसार, सौर वर्ष ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते. पण चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. अशा स्थितीत, दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक असतो. अशा स्थितीत सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास ३२ महिने, १६ दिवसांनी पुन्हा येतो. अशाप्रकारे दर तिसऱ्या वर्षी अधिक मास होतो. असाच योगायोग तब्बल १९ वर्षांनंतर या वेळी श्रावण महिन्यात घडला आहे. त्यामुळे या वर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होणार आहे.

– भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उखळीकर (धर्मशास्त्र अभ्यासक)

यावर्षी अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत असून त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत निज (शुद्ध) श्रावण महिना आहे. अमांत मास पद्धतीप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र या प्रदेशात श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवार चे उपवास, मंगलागौरी पूजन आदी निज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. (आपल्याकडील प्रदेशात श्रावणाचे ८ सोमवार नाहीत) तेंव्हा शुध्द श्रावणात एक महिनाच श्रावणातील पूजा, व्रत करावीत.

– मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)

हेही वाचा 

बीड: श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी गेवराईत मुक्कामी

श्रावण महिना विशेष : हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र

Adhik Maas 2023 | यंदा तब्बल १९ वर्षांनी आलाय अधिक श्रावण, जाणून घ्या याचे महत्व

 

Back to top button