Parbhani NCP : पाथरीत राष्ट्रवादीला खिंडार; माजी आमदारांसह पदाधिकारी शिंदे गटात | पुढारी

Parbhani NCP : पाथरीत राष्ट्रवादीला खिंडार; माजी आमदारांसह पदाधिकारी शिंदे गटात

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर नाराजी व्यक्‍त करीत पाथरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या आजी व माजी संचालकांनी रविवारी (दि.2) मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर (Parbhani NCP)  केले आहे. राज्यातील पुन्हा एकदा झालेल्या सत्‍तांतराच्या घडामोडीपूर्वीच या पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबईतील शपथविधीच्या सोहळयामुळे त्यांचा हा प्रवेश सायंकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पाथरी (Parbhani NCP)  विधानसभा मतदारसंघावर आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे वर्चस्व आहे. परंतु गेल्या काही दिवसांत त्यांच्या या वर्चस्वाला तडा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुरू केले आहे. विशेषत: मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक सईद खान यांनी त्यादृष्टीने चालविलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. मागील काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह तालुक्यातील सरपंचांना शिंदे गटात प्रवेश देण्यावर भर राहू लागला आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीतही शिंदे गटाने सईद खान यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्य निवडून आणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आ.बाबाजानी यांनी नाराजी व्यक्‍त करीत केवळ काही पदाधिकार्‍यांनी बाजार समितीत पॅनलचे काम न केल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचा ठपका ठेवल्याचे एका पदाधिकार्‍याने ‘पुढारी’ शी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर आ.बाबाजानी हे एककली कारभार करीत असल्याने त्यांच्या या कारभारावर असलेल्या नाराजीतूनच आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहोत, असेही स्पष्ट केले.

शिवसेनेत प्रवेश करणार्‍या पदाधिकार्‍यांमध्ये प्रामुख्याने माजी आ.माणिकराव आंबेगावकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सदस्य चक्रधर उगले, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद चिंचाणे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर यादव, जिल्हा परिषद सदस्य गोविंदराव देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ घांडगे, माजी सभापती तुकाराम जोगदंड, कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे माजी संचालक लहू घांडगे, माजी संचालक बालासाहेब सहजराव, पालिकेचे माजी सभापती अनिल पाटील यांच्यासह सरपंच व विविध कार्यकारी सोसायटयांच्या चेअरमनचा समावेश आहे. एकूण 30 जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात माजी सभापती टेंगसे यांनी शिंदे गटातील प्रवेशाचा हा सोहळा रविवारी दुपारी 4 वाजता निश्‍चीत झाला होता. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर हा सोहळा सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर होणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

Back to top button