

खेड; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्या सत्तास्थानी प्रवेशाने रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट होतील असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. अर्थात शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेते पदाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संघटनेचा विचार करावा लागेल. अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताना आमदार अदिती तटकरे या त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काहीही न बोलता खासदार सुनील तटकरे यांनी देखील अजित पवार यांना सहमती दर्शवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार समर्थक राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना यांना या राजकीय घडामोडीमुळे आगामी काळात अच्छेदीन येतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोकणातील राजकारणात शिवसेना, भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेली नवी राष्ट्रवादी आगामी काळात आपली पाळेमुळे अधिक घट्ट करेल असे चित्र आहे. अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांमध्ये चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या नावाची देखील चर्चा असून तसे झाल्यास सत्ता संघर्षात एकमेकांचे गेल्या चार दशकांपासून प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या नवीन समिकरणाने चिपळूण, गुहागर व दापोली मतदार संघावर थेट परिणाम होताना दिसणार आहे.
दापोलीत एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे पहिल्यांदाच निवडून आलेले योगेश कदम हे आमदार आहेत. तर शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना असा प्रवास केलेले भास्कर जाधव हे गुहागरचे विद्यमान आमदार आहेत. तर राष्ट्रवादीतून पहिल्यांदाच निवडून आलेले शेखर निकम चिपळूणचे आमदार आहेत. या तिन्ही मतदार संघात बहुतांश भागात तटकरे किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सर्व पातळ्यांवर सत्ता संघर्ष पहायला मिळतो. मात्र राज्यात सरकारमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार व शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र आल्याने शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या भागात अच्छेदिन येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.