‘औरंगजेब’बाबत पोलिस अलर्ट; सोशल मीडियावर टाईट पेट्रोलिंग | पुढारी

'औरंगजेब'बाबत पोलिस अलर्ट; सोशल मीडियावर टाईट पेट्रोलिंग

छत्रपती संभाजीनगर; गणेश खेडकर : सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अलर्ट झाले असून सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर वॉच ठेवला जात आहे. की वर्ड वापरून सोशल मीडियावरील पेट्रोलिंग अधिक टाईट केली आहे. हॅश टॅगनुसार काहीही आक्षेपार्ह आढळल्यास सायबर पोलिस संबंधित पोस्ट डिलीट करतात. अनेकांना समजही दिली जाते. काहींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर वॉच ठेवताना आक्षेपार्ह पोस्ट, सोशल मीडिया खाते, मेसेज आढळल्यास त्याचे स्कॅनिंग करून कठोर कारवाई केली जाते. शहर सायबर पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर पेट्रोलिंगची जबाबदारी दिलेली आहे. ते देशात, राज्यात आणि जिल्ह्यात जो ट्रेंड सुरू आहे, त्यावरून सोशल मीडियावर लक्ष ठेवतात. कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये औरंगजेबबाबत पोस्ट, स्टेट्स व छायाचित्र दाखविल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. कोल्हापुरात तर दंगल उसळली होती. हा ट्रेंड लक्षात घेऊन शहर सायबर पोलिसांनी हॅश टॅग वापरून लक्ष ठेवणे सुरू केले आहे. शहरात त्यासंबंधी काहीही पोस्ट असल्यास तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. सर्वात प्रथम ती पोस्ट डिलीट केली जाते. त्यानंतर स्कॅनिंग करून संबंधिताला समज दिली जाते. त्यावर पुढे जाऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाते.

अफवांवर विशेष लक्ष

सोशल मीडियावरील अफवा सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करतात. त्यामुळे सायबर पोलिसांची सोशल मीडियावरील अफवांवर विशेष नजर आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, यूट्यूब, टेलीग्राम, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिस निगराणी ठेवत आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी अनेकजण ट्वीटचा वापर करतात. त्यावरही पोलिसांची विशेष नजर आहे. ट्वीटसाठी विशेष कर्मचारी तैनात केलेले आहेत.

Back to top button