‘सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याप्रकरणी ११ गुन्ह्यांमध्ये १५ आरोपींना अटक | पुढारी

‘सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल केल्याप्रकरणी ११ गुन्ह्यांमध्ये १५ आरोपींना अटक

वाशीम, पुढारी वृत्तसेवा : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था रहावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल दक्ष असते. कायद्याचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. हल्ली समाजकंटक सोशल मिडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक झाले आहे.

या प्रकरणी कलम १५३(अ), २९५(अ) भादंवि अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाते. या वर्षी सोशल मिडियाचा दुरूपयोग करून आक्षेपार्ह पोस्ट/लेख प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांविरोधात कलम १५३ (अ) व २९५(अ) भादंवि अन्वये ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकूण १५ आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर वाशिम जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल तसेच पोलीस स्टेशन लक्ष ठेवून आहे.

‘नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर समाजाच्या हितासाठी सामाजिक एकोपा, बंधुभाव कायम राहावा यासाठी करावा. सोशल मिडीयाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत असून या विरोधात 11 गुन्हे दाखल करून 15 आरोपींना अटक करण्यात आली असून यापुढे देखील अश्याप्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत.

नागरिकांनी त्यांना आलेल्या संदेशावर/अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे अफवा पसरविणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’ असे आवाहन जिल्हा पोलीसांनी केले आहे.

 

Back to top button