हिंगोली: कळमनुरीत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी | पुढारी

हिंगोली: कळमनुरीत विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी येथील इंदिरानगर भागात विजेच्या खांबाच्या तणावामध्ये वीज उतरली. याचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि.५) सकाळी उघडकीस आली आहे. रामराव मारोतराव गवळी (वय 43) असे मृताचे नाव आहे.

कळमनुरी येथील रामराव गवळी हे इंदिरानगर भागात मागील काही वर्षांपासून राहतात. त्यांच्या घरासमोरच विजेचा खांब असून त्याचा तणावा त्यांच्या घरात आला आहे. या तणावामुळे घरात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता होती. त्यामुळे रामराव यांनी तणावा काढून घेण्यासाठी वीज कंपनीला वारंवार कळविले होते. मात्र, त्यानंतरही वीज कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, रविवारी त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी नातेवाईकांकडे गेल्यामुळे ते घरात एकटेच होते. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरात आलेल्या तणावामध्ये वीज प्रवाह उतरला. अन् त्याला धक्का लागून रामराव यांचा मृ्त्यू झाला. हा प्रकार शेजारी असलेल्या बाळू पारवे यांना कळाला. त्यांनी रामराव यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती नागरिकांनी महावितरण कंपनी दिली. कंपनीने तातडीने वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तणावाला चिटकलेल्या रामराव यांचा मृतदेह बाजूला करण्यात आला. घटनास्थळी कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा शहारे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर दाखल झाले.

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीज कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य राहूल उर्फ पिंटू पतंगे यांनी केली आहे. मृत रामराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button