धाराशिव : परंडा-बार्शी राज्‍यमार्गावर एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी | पुढारी

धाराशिव : परंडा-बार्शी राज्‍यमार्गावर एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी

परंडा ; धाराशिव : परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला मार लागला आहे, तर २३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सोनगिरी येथे बस पलटी होऊन घडलेल्या अपघाताची माहिती समजताच पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका मदतीसाठी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. उल्फा नदीच्या पुला शेजारील रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपे वाढलेली आहेत. त्‍यातच रस्त्यावर साईड पट्या नसल्याने वाहन चालविताना चालकाला अंदाज न आल्याने बस पलटी होऊन अपघात झाला आहे.

खोल खड्ड्यात गाडी पलटी झाल्याने समोरील व वाहकाच्या बाजूकडील अनेक प्रवाशांना मोठ्या जखमा झाल्या. सोनगिरी, खासगाव परिसरातील तरुणांनी मोठ्या शर्तीने जखमींना बाहेर काढत मदत केली. जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात वृध्द कलाकर मानधन समितीच्या मुलाखतीला जाणारे कात्राबाद, कुंभेजा, सोनगिरी, देवगाव, आवारपिंपरी येथील वारकरी संप्रदायातील वृध्द महिला -पुरुष होते. या अपघातामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण झाली होती.

घटनास्थळी परंडा पोलिसांनी येऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणारे जखमी प्रवासी वाहन चालक सतीश पसारे, वाहक संतोष होळकर, चंद्रभागा वेताळ , दत्ता वेताळ, समिना पठाण, मंगल बोराडे, कल्याण बोराडे, आशपाक काझी, नुसरत काझी, रमेश आपर, संजय गुडे, जयसिंग नरसाळे, मुस्तफा शेख, श्रीमंत मुळीक, सहीर सय्यद, तमन्ना पठाण,रुकसाना नायर, आदित्य सोनवणे, मुकुंद करपे, बाळासाहेब कानगुडे, सोमनाथ गायकवाड, अनिता मुळीक, शिवकन्या दुधकवड, दौलत नरवड, मारुती जाधव, लता गुडे यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे युवा नेते रणजित पाटील यांनी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस केली.

हेही वाचा : 

Back to top button