अहमदनगरचे नामांतर झाले, विभाजनाला मुहूर्त कधी? | पुढारी

अहमदनगरचे नामांतर झाले, विभाजनाला मुहूर्त कधी?

नगर : संदीप रोडे : ५३३ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ‘अहिल्यादेवीनगर’ असे झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राजमाता होळकर यांचे जन्मगाव चौंडी (ता. जामखेड) येथे घोषणेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्यात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. त्याला आता कधी मुहूर्त लागेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

नगर हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा क्षेत्रफळाने किती मोठा हे नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्यात नुकतेच नवे महसूल मंडल, तलाठी कार्यालयांचा विस्तार झाला. त्यात नगर जिल्ह्यात तब्बल २०२ तलाठी व ३१ मंडलांची भर पडली. आता जिल्ह्यात ७८८ तलाठी आणि १३१ मंडल कार्यालये झाली आहेत. उत्तरेसाठी नव्याने अप्पर जिल्हाधिकारी पदनिर्मिती विखे पाटील यांच्याच पुढाकारातून झाली. जिल्ह्याचा विस्तार पाहता महसूल विभागात वाढ झाली. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नगर, श्रीरामपूर येथे अप्पर पोलिस अधीक्षकांची कार्यालय आहेत. असे असतानाही विभाजानचे घोगडे मात्र लटकलेलेच आहे.

विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येतो अन् पुन्हा लालफितीत अडकतो. खांदेपालट झाल्यानंतर राज्यातील शिंदे- खांदेपालट झाल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘विभाजनापेक्षा विकास’ला महत्त्व देत विभाजन अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असलेला नगर जिल्हा महसुली विभागासाठी नाशिक, न्यायिक विभागासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ (छत्रपती संभाजीनगर), तर शैक्षणिक दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी जोडलेला आहे.

नव्या मुख्यालयाच्या जिल्हा वादाचे कारण पुढे करत विभाजन रखडले आहेत. श्रीरामपूर, संगमनेर की शिर्डी असा जिल्हा मुख्यालयाचा वाद आहे. विभाजनासाठी श्रीरामपुरात जिल्हा कृती समिती स्थापन झाली असून तिचा लढा सुरू आहे. मात्र या लढ्याला जोपर्यंत राजकीय पाठबळ लाभत नाही, तोपर्यंत विभाजन होणे शक्य नाही. विभाजन केले तर सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या नगरवरील कमांड सुटेल अशी भीती या राजकारण्यांना सतावत असेल, अशीही शक्यता वर्तविली जाते.

Back to top button