हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्‍या तिघांना अटक, दोन जण फरार | पुढारी

हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्‍या तिघांना अटक, दोन जण फरार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा वसमत शहरालगत आसेगाव रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. उर्वरीत दोनजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून छऱ्याची पिस्टल, सब्बल, कत्ता, मिरचीपूड व सुरा जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात आज (शुक्रवार) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी फरार दोघांचा शोध सुरु केला आहे.

जिल्हयात पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 13 पोलिस ठाण्यांतर्गत गस्त सुरु असते. गस्तीपथकांना फिक्स पाँईंटवर जाऊन हजेरी द्यावी लागत आहे. त्यामुळे गस्तीपथकेही सतर्क झाली आहेत. दरम्यान, वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल महिपाळे, सुरेश भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख हकीम, जमादार भगीरथ सवंडकर यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी आसेगाव रोडवर एका रिकाम्या प्लॉटच्या बाजूला काहीजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने झुडूपात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सदर पथकाने (गुरुवार) मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये पाचजण झुडूपात असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले असून, उर्वरीत दोनजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक छर्ऱ्यांची पिस्टल, एक सुरा, एक सब्बल, मिरची पूड, दोरी जप्त केली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक महिपाळे यांच्या तक्रारीवरून अक्षय पिराजी पवार, बाबा नागोराव गोरे, बालाजी उर्फ सिन्ना नागोराव गोरे, शिवा यलप्पा गुंडाळे (सर्व रा. कारखाना रोड वसमत), शेख अहमद शेख नसीर (मुशाफीर मोहल्ला वसमत) यांच्या विरुध्द शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक भोसले हे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी शिवा गुंडाळे व शेख अहमद या दोघांचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button