छत्रपती संभाजीनगर : संकेत कुलकर्णी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप; कारखाली चिरडून केला होता खून | Sanket Kulkarni Murder Case | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : संकेत कुलकर्णी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप; कारखाली चिरडून केला होता खून | Sanket Kulkarni Murder Case

Sanket Kulkarni Murder Case : तरुणीशी बोलण्यावरून झाला होता वाद

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिडको येथे संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणास पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा संकेत जायभाय यास आज (दि.३१) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर संकेत मच्चे, उमर पटेल व विजय जोग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी शिक्षा सुनावली. (Sanket Kulkarni Murder Case)

संकेत संजय कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सिडकोतील कामगार चौकाजवळ २३ मार्च २०१८ रोजी भरदुपारी पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून निर्घृण खून केला होता. यातील आरोपी संकेत जायभाय, संकेत मच्चे, उमर पटेल व विजय जोग यांना पोलिसांनी अटक करून तपास केला होता. या घटनेनंतर शहरातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला होता. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर शासनाने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती केली होती.

सरकारी पक्षाने 22 साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी साहाय्य केले. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. राजेश काळे, ॲड. नीलेश घाणेकर, ॲड. भाले, ॲड. दळवी यांनी बाजू मांडली. (Sanket Kulkarni Murder Case)

Sanket Kulkarni Murder Case का केला होता खून?

संकेत जायभायची एका तरुणीसोबत मैत्री होती. मात्र, ती तरुणी संकेत कुलकर्णीसोबत बोलते, याचा राग जायभायच्या मनात होता. कुलकर्णी हा परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रहिवासी होता. पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर २३ मार्च २०१८ रोजी जायभाय याने त्यास कामगार चौकाजवळ बोलावले. तेथे दोघांत वाद झाला. संकेत कुलकर्णी निघून जात असताना जायभाय याने त्याच्या अंगावर पाच ते सहा वेळा कार घालून खून केला.

संकेतला श्रद्धांजली

संकेत जायभाय यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर कुलकर्णी परिवार आणि मित्रमंडळीतर्फे कामगार चौकातील घटनास्थळावर संकेत कुलकर्णीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
·

हेही वाचा 

Back to top button