बायको माहेराला म्हणून गेली अन्... केलं दुसरं लग्न

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आईची तब्येत बिघडली असल्याने मी माहेरी जात असल्याची बतावणी करत मुकुंदवाडी परिसरातील एका विवाहितेने माहेर गाठले, परंतु काही दिवसांतच तिने दुसऱ्याशी लग्न केल्याची बातमी पतीच्या कानावर येताच पतीने मुकुंदवाडी पोलिसांकडे धाव घेऊन पत्नी व तिच्या माहेरच्या विरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.
मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात राहणाऱ्या चंद्रकांत (३२) या तरुणाने २७ मे रोजी मुकुंदवाडी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझी पत्नी १० दिवसांपूर्वी आईची तब्येत खराब असल्याचे सांगून कुंभेफळ येथे माहेरी गेली. जातेवेळेस तिने घरातील अडीच लाख रुपये रोख व अंगावरील सोन्याचे दागिने सोबत नेले. चार पाच दिवसांनंतर तिला फोन केला परंतु त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान २६ मे रोजी चंद्रकांतच्या मित्रांनी त्याच्या पत्नीने दुसऱ्या सोबत लग्न केलेला फोटो पाठवला. हे पाहून चंद्रकांतला धक्का बसला, याची चौकशी केली असता सासरचे लोक काहीही सांगण्यास तयार नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
माहिती घेऊन सांगतो
याबाबत पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याशी संपर्क साधला असता मी कामानिमित्त कोर्टात असल्याने या बाबत काहीच माहिती नाही. माहिती घेऊन तुम्हाला कळवतो असे उत्तर देऊन अधिक माहिती देण्याचे टाळले
चार वर्षांचा मुलगा घरीच सोडला
दरम्यान, चंद्रकांत आणि त्याच्या पत्नीला चार वर्षांचा एक मुलगा आहे. या विवाहितेने मुलाला घरीच सोडून दुसऱ्या सोबत घरोबा केल्याने चंद्रकांत आणि त्याचे कुटुंबीय दहशतीत आहेत. या प्रकरणी माझ्या पत्नीसह सासरच्या लोकांविरुद्ध कारवाई करून मला न्याय देण्याची मागणी तक्रार अर्जात केली आहे.