Hingoli: पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत, धक्काबुक्की करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

Hingoli: पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत, धक्काबुक्की करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील न्यायालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून पोलिस कर्मचाऱ्याची गच्ची धरून ढकलून देणाऱ्या एका तरुणावर हिंगोली (Hingoli) शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.३०) रात्री उशीरा सरकारी कामात अडथला आणल्या प्रकरणी संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील रहिवासी असलेला संतोष विठ्ठळ शेळके हा मागील काही दिवसांपासून हिंगोली शहरातील (Hingoli)  मस्तानशहा नगरात राहतो. त्याच्यावर यापुर्वी देखील अनेक गुन्हे असल्यामुळे त्याला हिंगोली जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो हिंगोली शहरात आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तो न्यायालयात आला होता. यावेळी त्याने न्यायालयाच्या परिसरात आरडा ओरड करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. त्यानंतर त्याने दरवाजाच्या काचा फोडल्या. या प्रकारानंतर पोलिस कर्मचारी बाबुराव अंभोरे यांनी त्याला पकडले. मात्र त्याने अंभोरे यांनाही शिवागीळ करून त्यांची कॉलर पकडली व बाजूला ढकलून दिले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुवर्णा वाळके, जमादार संजय मार्के, अझर पठाण, शेख अमजद, होळगीर यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतोष याला ताब्यात घेतले. या प्रकरणी जमादार अंभोरे यांच्या तक्रारीवरून संतोष शेळके याच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक ठेंगे पुढील तपास करीत आहेत.

Back to top button