हिंगोली : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे शेतकरी बैलजोडी पासून दुरावले | पुढारी

हिंगोली : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे शेतकरी बैलजोडी पासून दुरावले

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून करीत आला आहे. परंतु,अलिकडे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे बैलजोडी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. त्यातच बैल खरेदीचा लाखाच्या घरात गेलेला आकडा आणि बैलांच्या संगोपनाचा खर्च हाताबाहेर गेल्याने टॅक्टरच्या माध्यमातून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे कृषी प्रधान देशात यांत्रिकीकरण वाढल्याने बैलजोडी मशागत कालबाह्य होऊ लागली आहे.

खरीप व रब्बी हंगामातील शेतीची मशागत व नांगरणी बैलजोडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सध्याच्या परिस्थितीत निसर्गाच्या अवकृपाने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. उत्पन्न कमी व खर्च जास्त येत असल्याने शेतकऱ्याला बैलजोडी, चारा, मजुरी यांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या  माध्यमातून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक भर आहे. तसेच शासनाकडूनही विविध सबसिडीच्या माध्यमातून ट्रॅक्टर व मशागत आणि पेरणीचे लहान- मोठे यंत्र उपलब्ध होत आहे. जवळपास १० एकर क्षेत्र असलेले शेतकरी ट्रॅक्टर व यंत्राचा वापर करत असल्याने ठराविक शेतकऱ्यांकडेच बैलजोडी पाहायला मिळत आहे. कमी वेळात व कमी खर्चात शेतीची कामे होत असल्याने आता बैलजोडीच्या माध्यमातून होणारी शेतीची मशागत आता आठवणीतच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

           हेही वाचलंत का ? 

 

Back to top button