नांदेड : एका कामगाराचा मुलगा बनला कामगार आयुक्त!

कुंडलवाडी, पुढारी वृत्तसेवा कुंडलवाडी पासुन तीन कि.मी.असलेल्या हज्जापूर येथील अक्षय तुरेराव यांची राज्यसेवा २०२१ मधून सहायक कामगार आयुक्त गट अ पदी निवड झाली. अक्षय सध्या वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे नायब तहसिलदार म्हणून काम पाहत आहेत. या त्याच्या संपूर्ण प्रवासात त्यांचे मोठे बंधू अजय तुरेराव यांची भूमीका खूप महत्वाची राहिली आहे. कोणतेही स्पर्धा परिक्षांचे क्लास न लावता त्यांनी आपल्या मोठ्या बंधूच्या मार्गदर्शनाखाली हे घवघवीत यश संपादीत केले आहे.
या ठिकाणी विशेष उल्लेख करावा वाटतो ते अजय भीमराव तुरेराव यांचा, कारण की, वडील हे कामगार, तर आई अंगणवाडी सेविका, जे काही उत्पन्नाचे साधन होते ते आई वडिलांचे कष्ट हेच होते. अशा स्थितीत अजयनी खचून न जाता, कधीही आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता, त्यांनी २०१८ मध्ये मेहनत,चिकाटी,दुर्दम्य इच्छाशक्ती, कष्ट घेण्याची तयारी, या बळावर त्यांनी थेट राज्यसेवेतून या क्लास वन ऑफिसरपदी त्यांची निवड झाली.
हा सर्व आपल्या दादाचा संघर्षमय प्रवास अक्षयने जवळून पाहिला होता, आपल्या दादांकडून त्याला खूप मोठी प्रेरणा मिळाली,आणि त्यातूनच तो ही राज्यसेवेची तयारी करू लागला आणि खूप कमी कालावधीमध्ये त्याने राज्यसेवेचा अभ्यास पूर्ण केला. २०२१ मध्ये नायब तहसिलदार पदी त्याची निवड झाली. २०२१ च्या राज्यसेवेचा निकाल २०२३ रोजी लागला. त्यात त्याची “सहायक कामगार आयुक्त गट अ पदी निवड झाली, असून त्यांचा २०२२ चा निकाल येणे बाकी आहे.
एका कामगाराचा मुलगा “कामगार आयुक्त“ होणं ही खूप मोठी बाबा आहे.
नांदेड जिल्ह्यातील, बिलोली तालुक्यातील, कुंडलवाडी पासून ३ की.मी अंतरावर असलेल्या हाज्जापूर या गावचा तो मूळ रहिवासी आहे. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हाज्जापूर मध्येच झालं, चौथी ते सातवी पर्यंत जि. प.कन्या शाळा कुंडलवाडी येथे झालं, आणि सातवी ते दहावी पर्यंत पानसरे हायस्कूल धर्माबाद, मग दहावी ते बारावी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तो कोल्हापूर मधून “बी टेक” झाल्यानंतर आपल्या मोठ्या बंधुकडून प्रेरणा घेऊन, त्याने राज्यसेवेची तयारी चालू केली,नंतर पुणे येथे स्थायिक झाला कोणताही महागडा क्लास न लावता, स्वतः च्या बुद्धिमत्तेच्या बळावर अक्षयने घवघवीत यश देखील मिळवले,असा त्याचा रोमांचक प्रवास आहे.
दोन्ही बंधू स्वतः च्या कर्तुत्वाने मोठे झालेले आहेत,अत्यंत ग्रामीण भागातून येऊन आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःला सिद्ध केलेले आहेत.त्यामुळे संबंध महाराष्ट्राने त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणा देणारी कहाणी आहे. अनेक विद्यार्थी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपली वाटचाल करत आहेत.
हेही वाचा :
- Monsoon Update | यंदा मान्सून ‘सामान्य’च; ‘या’ दिवशी केरळमध्ये होणार दाखल, IMD ची माहिती
- शिर्डी : ‘समृद्धी’चा दुसरा टप्पा ‘सुवर्ण त्रिकोण’ठरेल! मंत्री विखे
- New Parliament Building Inauguration | नवीन संसद भवनाच्या उद्घाटन वादावर सुप्रीम कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली