लातूर : प्रभावाने दिली प्रेरणा, विलासरावांच्या लाखो छायाचित्रांचा संग्रह; अजयकुमार बोराडे पाटलांच्या निष्ठेचे कौतुक | पुढारी

लातूर : प्रभावाने दिली प्रेरणा, विलासरावांच्या लाखो छायाचित्रांचा संग्रह; अजयकुमार बोराडे पाटलांच्या निष्ठेचे कौतुक

लातूर; शहाजी पवार :  आपल्या नेतृत्व अन कर्तृत्वाने, भारदस्त व्यक्तीमत्व अन अमोघ वक्तृत्वाने, सर्वसामान्यांप्रति असलेल्या मातृ-हदयी तळमळीने आदरणीय ठरलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे अखंड प्रेरणेचे स्त्रोत असून त्यांच्या या गुणसंपदेने अनेकजण त्यांचे फॅन झाले आहेत.

लातूर येथील युवा उद्योजक अजयकुमार बोराडे पाटील यांनी तर विलासरावांची छायाचित्रे, त्यांच्यावरील लेख अन त्यांच्या भाषणांचा अफलातून संग्रह केला आहे.

आजघडीस सुमारे पाच लाखांवर विलासरावांची छायाचित्रे त्यांच्याकडे असून बाभळगावचे सरंपच ते केंद्रीय मंत्री अशा त्यांच्या राजकीय प्रवासासह त्यांची कुटुंबवत्सलता अन त्यांच्या विलक्षण लोकसंग्रहाची साक्ष हा खजिना देत आहे.

विलासराव देशमुख

अचंबा वाटावा अशा या संग्रहामागची कहाणी रंजक आहे. याबाबत सांगताना बोराडे पाटील म्हणाले मी विलासरावांबद्दल खुप ऐकले होते. नववीत असताना त्यांचे भाषण ऐकले अन त्याने प्रभावीत झालो. त्यानंतर मी जिथे साहेबांचा कार्यक्रम असेल तिथे जावू लागलो. त्यांचे व्यक्तीमत्व, अभ्यासपूर्ण भाषणे, हजरजबाबीपणा यामुळे साहेबांबद्दलचा माझा आदर अधिक दृढ झाला व त्यांची छायाचित्रे काढण्यास मी सुरुवात केली. त्यांची जुनी छायाचित्रे जमवू लागलो. ही तळमळ पाहून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे असलेली साहेबांची छायाचित्रे मला दिली.

अवघ्या एका क्लीकने सुरुवात झालेला माझा हा संग्रह पुढे लाखांवर पोहचला त्यासाठी स्वतंत्र खोली करावी लागली. पुढे या छायाचित्रांचे देखणे अल्बम मी केले त्याची प्रदर्शने भरवली अन हे सारे साहेबांच्या कानावर गेले त्यांनी मला मुंबईला बोलावले अलिंगण दिले पाठीवर शाबासकी दिली. वैशालीताईंनीही कौतूक केले.

मला माहिती नसलेले साहेबांचे अनेक पैलू आपल्या संग्रहाने दाखवले अशी भावना वैशालीताईंनी व्यक्त केली. सिनेअभिनेते रितेश देशमुखांनी सांहेबांचा दहाव्या वर्गातील फोटो मला दिला. अमितभैय्या धिरजभैय्यांनीही कौतूक केले. पुढे विलासरावांचे बंधू माजी मंत्री दिलीपराव देशमुखांनी तर रेणा सहकारी साखर कारखान्यावर विलासरावांच्या नावे संग्रहालय उभारले त्यात माझ्या संग्राहातील छायाचित्रे आहेत. विलासरावांच्या भाषणांच्या सिडीज, बातम्या, लेख, विशेषांक आहेत. विशेष म्हणजे हा खजिना अजयने विविध समाजमाध्यमांवरुन सर्वांसाठी उपलब्ध करुन दिला असून करोडोंनी तो पाहिला असल्याचे अजयने सांगितले.

काय आहे संग्रहात ?

छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या सिडीज, विविध मासिके वर्तमानपत्रातील लेख व बातम्यांची कात्रणे, विलासरावांच्या विद्यार्थी तरुणपणातील छायाचित्रे, सरपंच ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास, कुटूंब तसेच कौटुंबीक कार्यक्रमातील अनेक छायाचित्रे या संग्रहात आहेत.

 

Back to top button