केज : दैठणा येथे तरुणाचा अज्ञात व्यक्तीकडून खून | पुढारी

केज : दैठणा येथे तरुणाचा अज्ञात व्यक्तीकडून खून

केज (बीड); गौतम बचुटे : केज तालुक्यातील दहिटना येथे एका ३८ वर्षीय तरुणांचा डोक्यात धारदार शस्त्राचे घाव घालून अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक सविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.

खुनाचा तपास करण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, बुधवारी ( दि. २० ऑक्टो) रोजी केज तालुक्यातील दैठणा येथे विलास चंद्रकांत मुळे वय (३८-वर्ष) या विवाहित तरुणांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात उजव्या डोळ्याच्यावर कपाळावर व कानशिलावर धारदार शस्त्र किंवा अणकुचीदार वस्तुचा घाव घालून खून केला.

मयताचे प्रेत हे गावच्या पश्चिमेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळून सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गवतात आढळून आले. मयताच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी बीड येथील श्वनापथकाच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. मयत विलास चंद्रकांत मुळे याच्या पश्चात पत्नी अर्चना मुळे (वय-३३ वर्षे) मुलगी कु. वेदिका वय (१२-वर्ष) व आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे यांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले.

दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल करपे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच यातील आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली. खूनाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सविता नेरकर व उपविभागीय अधिकारी केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपासा संदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Back to top button