परभणी: जाब तांडा येथे विजेच्या खांबाला स्पर्श होऊन चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

परभणी: जाब तांडा येथे विजेच्या खांबाला स्पर्श होऊन चिमुकल्याचा मृत्यू

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : अंगणात खेळत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून ३ वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना भागूनाईक जांब तांडा (ता. जिंतूर) येथे आज (दि.२३) सकाळी आठच्या सुमारास घडली. अनिकेत अमोल राठोड (वय ३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी चिमुकल्याची आई नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती. तर अनिकेत घरामध्ये खेळत होता. खेळता खेळता तो घराबाहेर आला. तेथेच अंगणात असणाऱ्या विजेच्या खांबाला खेळता खेळता त्याचा स्पर्श झाला. क्षणातच त्याचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून रस्त्याने जाणाऱ्या गावाकऱ्यांनी आरडा ओरड केली. मुलाची आई धावत घराबाहेर आली. गावकऱ्यांनी अनिकेतला खांबापासून दूर केले. आणि त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मावळली होती.

मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिल आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चार मुलीनंतर अनिकेत जन्माला आला होता.

दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वीज वितरण कंपनीने लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा 

Back to top button