परभणी: बाजार समितीची निवडणूक होईपर्यंत जिल्हा बँकेने कर्जवाटप थांबवावे; किसान सभा, मनसेची मागणी

परभणी: बाजार समितीची निवडणूक होईपर्यंत जिल्हा बँकेने कर्जवाटप थांबवावे; किसान सभा, मनसेची मागणी

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्याच्या सुचना सोसायटीच्या सचिवांना एका संचालकाने दिल्या आहेत. तरी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्ज वाटप थांबवावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा व मनसेच्या वतीने आज (दि.२०) जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका संचालकाचे पॅनेल उभे आहे. त्या पॅनेलमध्ये त्या संचालकाचा मुलगा उभा आहे. सध्या खरीप व रब्बी हंगाम नसताना तालुक्यातील पिंपळा, सोमठाणा, करंजी व रूढी या गावात लाखो रुपयांचे कर्ज वाटप जिल्हा बँकेमार्फत केले जात आहे. संबंधित संचालकाने तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांना घरी बोलावून बाजार समितीच्या मतदारांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी या कर्ज वाटप प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनात केली.

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कोणतेही कर्ज वाटप होणार नाही, याची दक्षता घेऊन आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर अखिल भारतीय किसान सभेचे लिंबाजी कचरे, अशोक बारहाते व मनसेचे दत्तराव शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून १० जूनला मतदान होणार आहे. १४ जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहे. एक अर्ज बाद झाला आहे. ३० मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या निवडणुकीत माजी विद्यमान सभापती पंकज आंबेगावकर व नारायण भिसे यांचे पॅनल विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक पंडितराव चोखट व मदनराव लाडाने यांनी पॅनल उभे केलेले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news