Body Donation: डावरे दाम्पत्याचा सेवाभावी आदर्श; पतीनंतर पत्नीचेही आठ वर्षांनंतर देहदान

Body Donation: डावरे दाम्पत्याचा सेवाभावी आदर्श; पतीनंतर पत्नीचेही आठ वर्षांनंतर देहदान

परभणी; प्रवीण देशपांडे: ध्येयवेडी माणसं आयुष्य जगत असताना आपण घेतलेला समाजकार्याचा वसा तर जोपासत असतात. पण उत्तरार्धातही काळाने देह हिरावून घेतल्यानंतरही आपले हे शरीर समाजाच्या शिक्षणासाठी कामी यावे, ही खूणगाठ ही मनाशी बांधून ठेवतात. याचा प्रत्यय परभणीतील लक्ष्मीकांत डावरे व त्यांच्या पत्नी उषाताई डावरे यांनी आणून देत 'मरावे परी कीर्ती रुपी उरावे' ही उक्ती सार्थ ठरवीत देहदान (Body Donation) केले.

आठ वर्षांपूर्वी 2015 मध्ये लक्ष्मीकांत डावरे (वय 81)यांचे तर आठ दिवसांपूर्वी उषाताईंचे (वय 86) निधन झाले. त्यावेळी डावरे यांच्या देहदानाच्या निर्णयाला खंबीर साथ देणाऱ्या उषाताईंनी पतीसह स्वतःची देहदानाची  (Body Donation) शेवटची इच्छा मुलगा विनोद डावरे यास पूर्ण करावयास लावली.

परभणीतील लोकमान्य नगरातील रहिवासी असलेले लक्ष्मीकांत डावरे हे मृद्संधारण खात्यातून सेवानिवृत्त झालेले तर पत्नी उषाताई या सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या, पदाधिकारी राहिलेल्या. पक्ष कार्याबरोबरच महिलांच्या चळवळीत अग्रभागी असलेल्या उषाताईंनी लेडीज क्लब, राष्ट्रसेविका समिती, महिला जागृती संघटना व इतर चळवळीतून महिलांच्या प्रश्नावर कार्य केले. आयुष्यभर पक्षाची वैचारिक बांधिलकी जोपासतानाच सामाजिक बांधिलकी देखील जोपासण्याचे काम त्यांनी केले.

दोन मुली, मुलगा असा परिवार असलेल्या डावरी कुटुंबीयांचे सामाजिक कार्यातील योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे. त्यांचा हा वारसा रंगकर्मी असलेला असलेले विनोद डावरे व त्याच्या मुली देखील चालवीत आहेत. 2010 मध्ये डावरे दांपत्याने देहदान करण्याचा निर्णय एकाच वेळी घेतला. दोघांचेही रीतसर अर्ज भरून ते मुलगा विनोद मार्फत जिल्हा शासकीय रुग्णालय देण्यात आले. वृद्धापकाळ जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी घेतलेला हा निर्णय दोघांनी निर्धाराने राबविण्याचे ठरविले.

2015 मध्ये वयाच्या 81 व्या वर्षी लक्ष्मीकांत डावरे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे पार्थिव नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी ते देखील वृद्धापकाळाने आजारी होते. मात्र, त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी उषाताईंनी मन घट्ट करून तो अंमलबजावणीत आणला. त्यानंतर उषाताई देखील आजारी पडल्या. मात्र पतीसोबत केलेला संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी ढळू दिला नाही. आजारी पडल्यानंतर ऑपरेशन करू देण्यासही त्यांनी नकार दिला. कारण ऑपरेशन केल्यास देहदानाचा संकल्प पूर्ण होईल की नाही, याची त्यांच्या मनात साशंकता होती. त्यातूनच त्यांनी ऑपरेशन करू दिले नाही आणि देहत्याग केला. त्यांच्या इच्छा प्रमाणे रविवारी (दि.१४) त्यांचे पार्थिव नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. पतीसोबत केलेला निर्धार उषाताईंनी प्रत्यक्षात आणला. एका सेवाव्रती दाम्पत्याचा हा आगळा वेगळा प्रवास समाजासाठी दिशादर्शक ठरणारा आहे .

 Body Donation : दुसऱ्या व तिसऱ्या पिढीने घेतला वसा

आई -वडिलांच्या देहाची त्यांच्या इच्छा प्रमाणे दान करण्याची पूर्ण प्रक्रिया मन खंबीर करून पूर्ण करणारा मुलगा विनोद डावरे हा देखील सामाजिक कार्यात सक्रिय आहे. रंगकर्मी असलेला विनोद मुलींच्या प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करण्याचे काम करतो. मुलगी ऐश्वर्याच्या पहिल्या वाढदिवसापासून प्रत्येक दिवशी प्रत्येक वाढदिवशी तिला सोबत घेऊन रक्तदान करणाऱ्या विनोदपासून मुलगी ऐश्वर्याने देखील वडिलांची ही परंपरा सुरू केली. वडिलांची ही रक्तदानाची परंपरा सुरू केली आहे. भरतनाट्यममध्ये मार्गदर्शक असलेली ऐश्वर्या ही दरवर्षी रक्तदान करते. या दोघांनाही प्रोत्साहन देणाऱ्या विनोदची पत्नी अनुजा डावरे या सर्व शिक्षा अभियानात काम करताना स्वतः देखील सामाजिक जाण ठेवून कार्य करीत आहेत. संपूर्ण कुटुंबाच सेवाकार्य आता दुसरी व तिसरी पिढी चालवीत आहे. अवयवदान समन्वयक म्हणून या कार्यत झोकून देणाऱ्या विनोदला आई-वडिलांच्या देहदानाच्या निर्णयात वेगळी असे काही वाटले नाही. त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करताना पुत्र धर्माचे पालन केल्याचे 'दैनिक पुढारी'शी बोलताना विनोदने सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news