पुढील आदेशापर्यंत औरंगाबादच...! जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय कार्यालयांना निर्देश | पुढारी

पुढील आदेशापर्यंत औरंगाबादच...! जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय कार्यालयांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली, मात्र उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत, या आदेशाचे काटेकोर पालन करा असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सर्व कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांना दिले आहेत.

शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर अनेक ठिकाणी खासगीरीत्या तर सर्रास बदललेल्या नावाचा उल्लेख सुरू झाला आहे. तर काही शासकीय कार्यालयांनीही कार्यालयांच्या नामफलकात नवीन नावाने बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतेच याबाबत जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख व विभागप्रमुखांना कार्यालयीन आदेश जारी केले आहेत, त्यात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झाली आहे. नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागांशी संबंधित कार्यालये जिल्ह्याचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते व त्यांच्या विधिज्ञांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल न करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या २० एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या आदेशाचे व आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी पांडेय यांनी निर्देश दिले आहेत.

Back to top button