बीड : गावरान आंबा हद्दपार; आमराया नष्ट; झाडांची सर्रास कत्तल | पुढारी

बीड : गावरान आंबा हद्दपार; आमराया नष्ट; झाडांची सर्रास कत्तल

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी प्रतिष्ठेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आमराया नष्ट झाल्याने गावरान आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात आंब्याच्या वृक्षांची रांग पाहावयास मिळत नाही. दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे गावरान आंबा नाहिसा होत आहे. ग्रामीण भागात असलेल्या अनेक आमराया या वृक्षतोडीने नष्ट झाल्या आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागात आंब्याच्या वृक्षांची रांगच रांग असायची यात लंगड़ा, शेंदऱ्या, रोप्या, संतन्या लाडू, गाडग्या, वाळक्या, सहद्या, नारळ्या असे अनेक आंब्याच्या फळाचे प्रकार ग्रामीण भागात प्रचलित असायचे. हे आंबे त्या शेतमालाच्या नावावर विकायचे. आमराईत पाड खाण्यासाठी मुलांची पळापळ, विषयांवरील गप्पा, आंब्याला बहर आला की, त्याचा दुरवर पसरणारा सुंगंध आता दुरापास्त झाला आहे. वसंताच्या आगमनाने ग्रामीण भागातील शेतात असलेल्या आम्रवृक्ष बहराने फुलून जायचा. रसाचे निमित्त करुन बहिणीबरोबरच जावईबापुंना बोलावून खमंग पुरणपोळी आणि सोबत गावरान आंब्याचा रस देवून पाहुणचार असायचा, ही पंरपरा मोडत आहे. लग्न समारंभात आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत आखणारेही त्याकाळी होते. आता तर स्वरुची भोजनातूनही आंब्याचा रस हद्दपार झाला आहे. झाडाच्या फांद्यावर टोळक्याने खेळायचा डाबडुबली आणि कडक उन्हात आंब्याच्या थंडगार सावलीत बसून रंगणाऱ्या चिलमी गप्पा आता कालबाह्य झाल्या आहेत. संत्र्याच्या पेट्यांसाठी व जळावू लाकडासाठी आंब्याच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button