चला पर्यटनाला : श्री गुरू गोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी | पुढारी

चला पर्यटनाला : श्री गुरू गोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी

नांदेड; पुढारी वृत्तसेवा :  शिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या गुरुद्वारा हुजूर साहिबच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या मुख्य गुरुद्वाराशिवाय शहर परिसरात आणखी 11 गुरुद्वारा आहेत.
महाराष्ट्राच्या पटलावर राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाच्या अशा नांदेड जिल्ह्याची शीख धर्मीयांच्या गुरुद्वारांमुळे वेगळी ओळख आहे. शिखांचे पाच प्रमुख गुरुद्वारा आहेत. त्यांत अमृतसर येथील सुवर्णमंदिर, आनंदपूर येथील श्री केशरगढ साहिब, तलवंडीचे श्री दमदमा साहिब, पाटणा येथील श्री पाटणा साहिबचा समावेश होतो. पाचवे क्षेत्र नांदेड असल्यामुळे येथील सचखंड गुरुद्वारा हुजूर साहिबला मोठे महत्त्व आहे.

1708 मध्ये गुरू गोविंद सिंग हे अबचलनगर (नांदेडचे जुने नाव) येथे आले असता, त्यांची हत्या करण्यात आली. आपला मृत्यू जवळ आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरू ग्रंथ साहिबजी यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नाव दिले. सर्व शिकवणी, उपदेश आणि जीवन जगण्याची पद्धती असणारा शिखांचा हा पवित्र ग्रंथ आहे. गोदावरी नदीच्या काठाजवळ असणार्‍या गुरुद्वारात गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन धनुष्य, बाण, पाच तलवारी आणि सुंदर दगडांनी जडलेली ढाल आहे. महाराज रणजितसिंह यांनी या गुरुद्वाराची उभारणी 1830 ते 1891 दरम्यान केली. नांदेडात 2008 मध्ये गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा झाला होता. या सोहळ्यामुळे नांदेड शहरात विकासाची मोठी कामे झाली. त्यामुळे शहराचा चेहरामोहराही बदलला. अर्थात, या कामांबद्दल पुढे वादही झाले, हा भाग वेगळा. राज्याचा विचार करता सर्वाधिक गुरुद्वारा नांदेडात आहेत. श्री हुजूर साहिबच्या जवळ गुरुद्वारा नगीना घाट आहे. या गुरुद्वाराचे काम दिल्लीतील राजे राजा गुलाबसिंग सेठी यांनी हाती घेतले होते. या गुरुद्वाराला आख्यायिका असून, एके दिवशी गुरू गोविंद सिंगजी इतर काही सहकार्‍यांसह गोदावरी नदीजवळ बसले होते. तेव्हा एक श्रीमंत व्यापारी त्यांच्याजवळ आला आणि त्यांना एक मौल्यवान दगड दिला. या दगडाचे नाव होते नगीना (रत्नजडित दगड). गुरुजींनी अनवधानाने तो दगड नदीत टाकला. गुरू गोविंद सिंग यांच्या या कृतीने व्यापारी अस्वस्थ झाला. गुरूंनी त्याला नदीतून दगड काढण्यास सांगितले. व्यापारी जेव्हा पात्रात उतरला तेव्हा त्याला सगळीकडे रत्नजडित दगड दिसू लागले.

त्याचा अभिमान क्षणात उतरला आणि तो गुरूला शरण गेला. नगीना घाटाजवळच संत भाई माधो दास बैरागी यांनी गुरुद्वारा बांधला. मुख्य गुरुद्वारापासून 12 कि.मी. अंतरावर शिकार घाट साहिब पांढर्‍या संगमरवरी दगडांनी उभारलेला आहे. गुरू जेव्हा सर्वप्रथम नांदेडला आले होते, तेव्हा त्यांनी ब्राह्मणवाडा भागात पहिला मुक्काम केला होता. त्या ठिकाणी गुरुद्वारा हिरा घाट साहिबचे निर्माण झाले आहे. हिरा घाटजवळच आता साहिबजी गुरुद्वारा आहे. नांदेड विमानतळाजवळ गुरुद्वारा मालटेकडी साहिब आहे. याशिवाय जुन्या शहरात संगत साहिब, पांगरी येथे नानकसर साहिब आणि नानकपुरी साहिब, वाडेपुरी येथे रतनगड साहिब गुरुद्वारा आहे. या प्रत्येक गुरुद्वाराची वेगवेगळी आख्यायिका आहे.

लंगर सेवा लोकप्रिय

रात्री दोन वाजल्यापासून गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होतो. रात्री 3.40 वाजता हुकूमनामा वाचला जातो. याशिवाय कीर्तन, दीपसेवा केली जाते. गुरुद्वाराचा परिसर अतिशय स्वच्छ असून रात्री 8 वाजता लेजर शो पाहण्यासारखा असतो. गुरुद्वारात लंगर सेवा लोकप्रिय असून, या सेवेचा लाभ भाविक घेतात. नांदेडला येणारे अनेक राजकीय, सामाजिक नेते गुरुद्वाराचे आवर्जून दर्शन घेतात.

विमानसेवा बंद

नांदेडला पंजाबातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या सोयीसाठी नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस 1995 पासून सुरू झाली. नांदेड येथे विमानतळ असून गुरू-ता गद्दी काळात दिल्ली, मुंबई, हैदराबादासाठी सेवा सुरू झाली होती. कालांतराने विमानसेवाही बंद झाली. अमृतसर-नांदेड विमान हे काही काळ चालू होते; परंतु पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने 2022 पासून विमानही बंद आहे. त्यामुळे नांदेडात यावयाचे असल्यास जवळचे विमानतळ छत्रपती संभाजीनगर अथवा हैदराबाद आहे.

Back to top button