परभणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार | पुढारी

परभणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार

मानवत, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाला भेटून परत घरी जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल वरून जाणाऱ्या तीन जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला. तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील रत्नापुर येथे सोमवारी (दि.५) घडली. आदेश भागवत मुजमुळे आणि प्रकाश भीमराव मुजमुळे असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, पोहनेर येथील छाया भागवत मुजमुळे (वय ४०) यांचा ऑटो पलटी झाल्याने रविवारी अपघात झाला होता.  या अपघातात त्या जखमी झाल्याने त्यांना मानवतच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा आदेश भागवत मुजमुळे हा इतर नातेवाईकासह सोमवारी मानवतला आला होता . भेटून परत पाथरीकडे जाताना मोटारसायकल  वरून जाणाऱ्या तिघांना रत्नापुर जवळ महामार्गावर एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत मोटारसायकल वरील तिघे जण गंभीर जखमी झाले. देवा पेडगावकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता आदेश भागवत मुजमुळे व प्रकाश भीमराव मुजमुळे यांचा मृत्यू झाल्याचे समजले . भारत प्रभू मुजमुळे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला परभणीला हलविण्यात आले आहे. अपघात घडताच वाहनचालकाने अपघातस्थळावरून पलायन केले असून सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचंलत का?

Back to top button