Pune Accident : इथेनॉल टँकर वाहनांना धडक देत थेट दरीत कोसळला; दिवे घाटातील अपघातात दोनजण ठार | पुढारी

Pune Accident : इथेनॉल टँकर वाहनांना धडक देत थेट दरीत कोसळला; दिवे घाटातील अपघातात दोनजण ठार

दिवे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटामध्ये भरधाव इथेनॉल टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन ते तीन वाहनांना धडक देत थेट दरीत कोसळला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, काही जण गंभीर जखमी झाले. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धनंजय पवार (वय 38, रा. भिवडी, ता. पुरंदर) व पांडुरंग शिंदे (वय 54, रा. सोमेश्वर, ता. बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सासवडकडून पुण्याच्या दिशेने टँकर (एमएच 12 केपी 6144) निघालेला होता. टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरून येणार्‍या वाहनांना उडवत टँकर शेजारी असलेल्या दरीत जाऊन कोसळला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नव्हती. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दखल झाले.

दिवे घाटात हा अपघात झाला असून, या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम सुरू होते. अचानक झालेल्या घटनेने काही वेळ नागरिकांना काही समजेनासे झाले होते. मात्र, टँकर वेगात असल्याने त्याला थांबविणे देखील अवघड होते. हा टँकर इथेनॉलचा होता. त्यामुळे पोलिसांनी घाटात थांबून वाहतूक मार्गात बदल केला.

Back to top button