धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गस्थळांचे विपुल वैभव; बीड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीला वाव | पुढारी

धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गस्थळांचे विपुल वैभव; बीड जिल्ह्यात पर्यटनवृद्धीला वाव

बीड; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणार्‍यांची संख्या मोठी आहे. विशेषतः बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैजनाथाचे परळी येथील मंदिर, अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. याबरोबरच ऐतिहासिक किल्ले, निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक येतात.

परळी येथे महादेवाचे मंदिर चिरेबंदी भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. अंबाजोगाईची योगेश्वरी देवी कोकणवासीयांची माता. कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने दर्शनास येत असतात. योगेश्वरीच्या मंदिराप्रमाणेच मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज व मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत कवी दासोपंत यांचे समाधिस्थान ही दोन स्थळे उल्लेखनीय.

धारूर येथील ऐतिहासिक किल्ला शहर व या परिसराच्या वैभवात भर टाकण्याचे काम करतो. 1568 च्या काळात आदिलशाहचा सरदार किश्वरखान लारी याने बांधलेला हा किल्ला आजही शाबूत व बर्‍याच बाबतीत चांगल्या स्थितीत आहे.

कंकालेश्वर, कपिलधार, सौताडा

बीडमधील प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर, कपिलधार येथील मन्मथस्वामी यांची समाधी व धबधबा, तसेच सौताडा येथील रामेश्वराचे मंदिर व धबधबा ही पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे आहेत. बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याचे कुंड असून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक पूल उभारलेला आहे. निसर्ग सहलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कपिलधारबरोबरच पाटोदा तालुक्यातील सौताडा येथेही भेट देतात.

धर्मापुरीचा प्राचीन किल्ला

धर्मापुरी हे गाव परळी तालुक्यात आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे एक प्राचीन किल्ला असून, तळेही आहे. धर्मापुरी हे गाव राष्ट्रकुट इंद्र पहिला याने वसविले. धर्मराजाच्या नावावरून धर्मापुरी असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. राष्ट्रकुट राजा दंतिदुर्ग ने इ.स. 754 मध्ये बादामी चालुक्यांचा पराभव करून बीड भागात राष्ट्रकुट साम्राज्याचा पाया घातला. धर्मापुरी हे गाव बालाघाटाच्या पर्वतरांगांत वसलेले आहे. या छोट्याशा गावात खूप मोठा इतिहास दडलेला आहे. धर्मापुरी ही प्राचीन कालीन चालुक्यांची धार्मिक राजधानी होती असे मानले जाते. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

कसे याल..?

अंबाजोगाई ते परळी वैजनाथ हे अंतर 25 कि.मी. आहे. परळी, अंबाजोगाईसाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून एसटी बसेस आहेत. याशिवाय परभणीहून परळीकडे जाण्यासाठी रेल्वे आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेसेवेचे विस्तारलेले जाळे आणि रुंदीकरणामुळे दक्षिण-मध्य रेल्वेच्या निजामाबाद, तिरुपती आदी शहरांकडे जाणार्‍या महत्त्वाच्या गाड्या परळी स्थानकावर थांबतात. परळीहून बस वा खासगी वाहनाद्वारे अंबाजोगाई, बीडकडे जाता येते. नगर-बीड-परळी हा प्रस्तावित रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास रेल्वेने या जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या वाढण्यास मदत होईल!

Back to top button