परभणी : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर | पुढारी

परभणी : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला . असून १० जून रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सहकारी संस्था मतदारसंघात उभे असलेल्या एका उमेदवाराच्या आकस्मिक निधनामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द झाली होती.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम सुरू असताना चिन्ह वाटप झाले. २१ एप्रिल रोजी सहकारी मतदारसंघात सर्वसाधारण गटात उभे असलेले तालुक्यातील मंगरूळ बु येथील रावसाहेब भुजंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले होते . त्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांच्याकडे पुराव्यासह करण्यात आली होती . २३ एप्रिल ला निवडणूक रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर गुरुवारी (दि. ४) जिल्हा निवडणूक अधिकारी (बाजार समिती) उमेशचंद्र हुशे व निवडणूक अधिकारी व सहायक निबंधक जयंत पाठक यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नवीन पत्रानुसार ८ मे ते १२ मे पर्यंत नामनिर्देशन दाखल करणे , १५ मे छाननी , १६ मे ला वैध पत्राची सूची , १६ मे ते ३० मे उमेदवारी अर्ज मागे घेणे, ३१ मे रोजी चिन्ह वाटप व १० जूनला सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान व दुपारी ४ नंतर मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे.

मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १८ जागेसाठी उमेदवार निवडले जाणार असून सहकारी संस्था मतदारसंघात ११ , ग्रामपंचायत मतदारसंघात ४ , व्यापारी २ तर हमाल व तोलारी मधून १ जागा आहे . माघे होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण १८ जागेसाठी ५१ जण रिंगणात उभे होते . तर रावसाहेब कदम यांच्या निधनामुळे एकूण ५० जण रिंगणात शिल्लक राहणार असून आता नव्याने होणाऱ्या प्रक्रियेत आणखी कोण कोण उमेदवार रिंगणात येतात यावरून चुरस निर्माण होणार आहे .

Back to top button