परभणी : बाजार समित्यांमधील राजकीय समीकरणे बदलणार | पुढारी

परभणी : बाजार समित्यांमधील राजकीय समीकरणे बदलणार

परभणी; प्रवीण देशपांडे : कृषी व ग्रामीण सत्‍ता कारणाचे केंद्र असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत जिल्हयातील मातब्बर नेत्यांनी केलेल्या प्रतिष्ठा व अस्तित्वाच्या लढाईत आपापले गट शाबुत राखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात महाविकास आघाडीला जोरदार यश आले असले तरी, यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरलेल्या भाजपनेही मिळविलेले यश हे भविष्यातील सत्‍ता कारणाची लढाई रंगविणारे ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही नांदी ठरल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हयातील मानवत वगळता दहा कृषी उत्पन्‍न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल मोठे चुरशीचे व रोमहर्षक ठरले. त्या-त्या तालुक्यातील प्रभावी नेतृत्वाने आपापले गड शाबुत राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्याचप्रमाणे नव्या चेहर्‍यांना देखील मिळालेले प्राधान्य हे जिल्हयातील दुसर्‍या फळीच्या नेत्यांना आगामी काळात मिळणारी संधी असल्याचे दिसून येते. दहा बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा महाविकास आघाडीने पटकावल्या आहेत. सहा समित्यांवर लक्षणिय यश मिळविताना बहुमताचा शिक्‍का घेतला आहे. त्यामुळे तेथील पुर्वापार चालत आलेली राजकीय समिकरणे ही सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत त्या नेत्यांचे अस्तित्व कायम राखणारी ठरणार आहेत.

जिल्हयाचे मातब्बर नेते आ.सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे खा.संजय जाधव, आ.डॉ.राहूल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी बाजार समितीत बाजूला सारताना मिळविलेला मोठा विजय हा समितीवर सत्‍ता स्थापीत करणारा ठरणार आहे. 18 पैकी 12 जागांवर शिवसेना, काँग्रेसने यश मिळवून सभापती पदाचे दावेदार ठरले आहेत. त्याचवेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही निकराची लढाई देत चार जागांवर मिळविलेले यश दखलपात्र ठरले आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात भाजपचा फारसा प्रभाव नसताना संपुर्ण पॅनलने विद्यमान लोकप्रतिनिधींशी दिलेली लढत व त्यातून मिळविलेले यश हे आगामी काळात भाजपला बळ देणारे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केली असली तरी त्याचा फारसा परिणाम या निकालातून दिसून आला नाही. या समितीवर पुर्वीपासूनच काँग्रेस व शिवसेनेचे राहिलेले वर्चस्व याही निवडणुकीतून शिक्‍कामोर्तब करणारे ठरले आहे.

जिंतूर मतदारसंघात पारंपारीक राजकीय वैमनस्य असलेल्या बोर्डीकर-भांबळे गटामध्ये पारंपारीक पध्दतीचा संघर्ष याहीवेळी दिसून आला. दोन्ही गटांकडून मोठया प्रमाणावर मोर्चेबांधणी करून या मतदारसंघातील तीन बाजार समित्या ताब्यात घेण्याचा कसोसिने केलेला प्रयत्न बोर्डीकर गटाला फायदेशीर ठरला. जिंतूरात 14 तर बोरीत 12 जागांवर यश मिळवून बहुमत प्राप्‍त करण्यामध्ये भाजपच्या आ.मेघना बोर्डीकर यांचे राजकीय कौशल्य मजबुत असल्याचे दिसून आले. या दोन्ही समित्यांमध्ये त्यांना यश आले असले तरी सेलूमध्ये मात्र, बोर्डीकरांना सहा जागांवर थांबण्याची वेळ आली. याउलट या दोन्ही समित्यांमध्ये चार व सहा जागा मिळविणार्‍या माजी आ.विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सेलूमध्ये मात्र 10 जागांच्या रूपाने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील चार बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला एकहाती कौल दिलेला नाही. मात्र तरीही प्रत्येक पक्षाच्या नेतेमंडळींनी आपल्या समर्थकांना निवडुन आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.

गंगाखेडमध्ये भाजपचे सहयोगी असलेल्या आ.रत्नाकर गुट्टे यांनी भाजपविरोधातच उभ्या केलेल्या पॅनलला सात जागा मिळवून दिल्या. मात्र, या प्रयत्नात भाजपवर पुर्णत: कुरघोडी करण्यात त्यांना यश आले. एकही जागा भाजप प्रणित पॅनलला मिळू शकली नाही. या दोघांतील भांडणाचा महाविकास आघाडीला येथे मोठा लाभ झाला. खा.संजय जाधव, माजी आ.सिताराम घनदाट, माजी आ.मधुसूदन केंद्रे यासह स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीला 11 जागांवर यश मिळविले यामुळे ही समिती आघाडीच्या ताब्यात आली आहे. ताडकळसमध्ये मात्र भाजपला काठावरचे बहुमत मिळाले. 9 जागांवर भाजप प्रणित पॅनलने यश मिळविले.

या समितीत काँग्रेसने सहा तर राष्ट्रवादीने तीन जागांवर यश संपादन केल्याने येथील बहुमता अभावी सत्‍ता संपादनाची लढाई चुरशीची ठरणार आहे. पुर्णेत महाविकास आघाडीने 15 जागा मिळवून एकतर्फी वर्चस्व स्थापीत केले. भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानण्याची वेळ आली. पालममध्ये शिंदे गटाने आ.गुट्टे यांच्या रासपसोबत हातमिळवणी करत तब्बल 14 जागा मिळवीत बहुमत मिळविले. त्यामुळे आ.गुट्टे यांचे एकतर्फी वर्चस्व या समितीत दिसून आले. महाविकास आघाडीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

आ.बाबाजानी, विटेकरांचे वर्चस्व कायम

पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठ व पाथरी या दोन बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. याठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा पाथरीत आ.बाबाजानी र्द्राणी यांचे असलेले वर्चस्व व सोनपेठात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे असलेले वर्चस्व अबाधित राहिले आहे. पाथरीत आ.बाबाजानी यांच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या त्याचवेळी प्रथमच बाबाजानींच्या वर्चस्वाला शह देण्याचा शिवसेना शिंदे गटाने केलेला प्रयत्नही काही प्रमाणात यशस्वी ठरला आहे. शिवसेनेने याठिकाणी मिळविलेल्या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकांत धोकादायक ठरू शकतात. सोनपेठ मध्ये 18 पैकी 18 जागा जिंकून काँगे्रस प्रणित पॅनलला पराभवाची धुळ चाखण्यास कारणीभुत ठरून विटेकरांनी एकतर्फी केलेले यश संपादन त्यांचे प्रभावक्षेत्र अबाधित ठरविणारे ठरले आहे.

हेही वाचा;

Back to top button