राज्यात ६ वर्षांत हजारांवर अर्भके फेकली रस्त्यावर | पुढारी

राज्यात ६ वर्षांत हजारांवर अर्भके फेकली रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : अनैतिक किंवा बळजबरी संबंधातून जन्मलेली अर्भके रस्ता, उकिरड्यावर फेकून देण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात २०१७ ते २०२२ या सहा वर्षांत तब्बल एक हजार ३१ जिवंत अर्भकांना रस्त्यावर फेकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नक्कीच नाही. चालू वर्षात हा आकडा चार महिन्यांतच ५५ च्या घरात गेला असून छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात आठ जिवंत अर्भके फेकून दिली आहेत. यात ४ मुली अन् ४ मुलांचा समावेश आहे. अनैतिक संबंधासारखी चूक पालकांनी करायची आणि त्यांची शिक्षा या नवजात बाळांनी का भोगायची, असा प्रश्न बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने कटके यांनी केला आहे.

अनैतिक संबंधातून किंवा अन्य कोणत्याही कारणातून तुम्हाला नको असताना मुलगा अथवा मुलगी जन्मली की निर्दयी पालक, अशा बाळांना फेकून देतात. असे अर्भक आढळले की पोलिसांना माहिती दिली जाते. पुढे ही अर्भके तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केली जातात. त्यानंतर हा प्रकार बाल कल्याण समितीपुढे जातो. बाल कल्याण समितीला न्यायिक दर्जा असल्याने समिती अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊन या अर्भकांना शिशुगृहात ठेवते. तेथे त्यांचे पालन, पोषण, संगोपन केले जाते. ही मुले जशी मोठी होतील तशी त्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते. त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.

गुन्हा सिद्ध झाल्यास ७ वर्षे तुरुंगवास, दंड

नवजात जिवंत अर्भकाला फेकून दिल्यास भारतीय दंड संहिता कलम- ३१५ नुसार गुन्हा नोंद होतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास ७ वर्षे तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तर, फेकून दिल्यानंतर अर्भक मृत झालेले असल्यास किंवा लावलेली असल्यास भारतीय दंड त्याच्या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट संहिता कलम ३१८ नुसार गुन्हा नोंद होते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास २ वर्षे शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतो

अर्भक रस्त्यावर फेकू नका

कोणीही अर्भक फेकून देऊ नका. तुम्हाला नको अस- लेले बाळ बाल कल्याण समितीकडे आणून द्या. असे केल्याने त्या बाळाला जीवदान मिळेल. बाल कल्याण समिती त्यांचे पालन, पोषण तर करेलच. शिवाय, त्याच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलेल. त्याला सुखाचे आयुष्य देण्यासाठी प्रयत्नशील राहील. दत्तक प्रक्रिया राबवून ही मुले योग्य त्या पालकांना दत्तक दिली जातील. जे लोक अशा अर्भकांना बाल कल्याण समितीकडे आणून देतील त्यांची ओळख गुपित ठेवली जाईल.
– अॅड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, छत्रपती संभाजीनगर

Back to top button