बुलढाणा जिल्ह्यात मविआने तीन तर भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी एका बाजार समितीवर रोवला झेंडा.. | पुढारी

बुलढाणा जिल्ह्यात मविआने तीन तर भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी एका बाजार समितीवर रोवला झेंडा..

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यातील १० पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निवडणूक निकाल आज (शुक्रवार) रात्री उशिरा घोषित झाले. जिल्ह्यातील उर्वरित पाच बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. घोषित निकालानुसार, महाविकास आघाडीने बुलढाणा, खामगाव व देऊळगाव राजा या तीन बाजार समित्यांवर आपले वर्चस्व कायम राखले. मलकापूर बाजार समितीवर भाजपाने तर मेहकर बाजार समितीवर शिवसेनेने झेंडा रोवला.

शुक्रवारी अतिशय चुरशीच्या वातावरणात ह्या निवडणुका झाल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. बुलढाणा बाजार समितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली मविआच्या १२ उमेदवारांनी विजयाची बाजी मारली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या. आ.गायकवाड यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

मेहकर बाजार समितीत शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील भुमीपूत्र पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकून बाजार समितीवर वर्चस्व कायम राखले आहे. मेहकर बाजार समितीत मविआला सात जागा मिळाल्या. देऊळगाव राजा बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील मविआच्या पॅनेलने १५ जागा मिळवल्या, तर भाजपा-सेनेच्या पॅनेलने तीन जागा मिळवल्या.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव बाजार समितीत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वाखालील मविआ पॅनेलने १५ जागा जिंकल्या. येथे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्याने आ.फुंडकर यांना मोठा धक्का बसला.
मलकापूर बाजार समिती सलग १५ वर्षापासून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात होती. यावेळी भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या पॅनेलने १६ जागा जिंकून ही समिती भाजपाकडे खेचून घेतली. म.वि.आ.ला मलकापुरात केवळ दोन जागा मिळवता आल्या. जिल्ह्यातील पाचपैकी तीन बाजार समितीवर झेंडा रोवून मविआने आपले वर्चस्व अधोरेखीत केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button