पैठण ; पुढारी वृत्तसेवा मोहटा देवी मढी येथून देवदर्शन करून पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या एका हॉटेल समोर जेवणासाठी थांबलेल्या महिला भाविकाच्या वाहनाला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात तेरा वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (शुक्रवार) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातामध्ये सहा महिला भाविक जखमी झाले आहेत. मृत झालेल्या बालीकेचे नाव साक्षी परमेश्वर कोरडे (वय १३) असे असून, ती गोलटगाव तालुका छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, गोलटगाव तालुका छत्रपती संभाजीनगर येथील गावातील भाविक महिला मंडळींनी मोहटा देवी व मढी दर्शनासाठी जाण्यासाठी गावातून एक टाटा एस वाहन बुक केले होते. या वाहनातून देवदर्शन करून ते शुक्रवारी रात्री पैठण मार्गे गोलटगावाकडे परत येत असताना. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलेले असताना यामध्ये जेवण न करणाऱ्या महिला वाहनातच बसून होत्या. या दरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डबल नंबर असलेल्या एका टिप्परणे महिला भाविक बसलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनात बसलेल्या साक्षी परमेश्वर कोरडे (वय १३) या मालिकेचा दुर्देवी मृत्यू झाला, तर इतर महिला जखमी झाल्या.
कडूबाई सोरमारे (वय ७०), गया हरी आडे (वय ६५), पार्वताबाई परमेश्वर कोरडे (वय ४०), द्वारकाबाई खटखळ (वय ६५), नंदकिशोर निबाळकर (वय ४०), कैलास राजपूत (वय२५) (सर्व रा. गोलटगाव तालुका संभाजीनगर हे गंभीर जखमी झाल्याने जखमींना तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यामध्ये गंभीर जखमी असलेल्या महिलेला रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे शासकीय रुग्णालयात व घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती.
हेही वाचा :