हिंगोली: हळदीच्या लिलावाला विलंब; शेतकर्‍यांचा बाजार समितीच्या आवारात गोंधळ | पुढारी

हिंगोली: हळदीच्या लिलावाला विलंब; शेतकर्‍यांचा बाजार समितीच्या आवारात गोंधळ

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये आज (दि.१७) संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या आवारातच गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर बाजार समितीच्या सचिवांनी शेतकर्‍यांची समजूत काढल्यानंतर तब्बल एक तास उशीराने म्हणजेच दुपारी दीड वाजता लिलावाला सुरूवात झाली.

येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये मराठवाड्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी येते. या ठिकाणी हळदीचे मोजमाप लगेच केले जाऊन पैसेही मिळत असल्याने दररोज 5 ते 10 हजार पोते हळदीची आवक होते. हळद विक्रीसाठी येथील मार्केटमध्ये रांगा लागतात. त्यानंतरही वाद होऊ नये, तसेच वजनासाठी वेळ मिळावा, यासाठी बाजार समितीकडून एक दिवस आड करून हळदीची खरेदी विक्री करण्यात येते.

दरम्यान, आज हळद मार्केटमध्ये तब्बल 10 हजार पोते हळदीची आवक झाली होती. त्यानंतर नेहमी प्रमाणे साडेबारा वाजता ऑनलाईन बीट (लिलाव) सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, यावेळेतही बीट सुरु झाले नसल्यामुळे दिवसभरात हळदीचे वजन होणार नाही. व शेतकर्‍यांना विनाकारण मुक्काम करावा लागणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. ऑनलाईन बीट होत नसेल, तर ऑफलाईन बीट सुरु करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली.

दरम्यान, बाजार समितीच्या परिसरात होणारा गोंधळ लक्षात घेऊन बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी तातडीने हळद मार्केटमध्ये जाऊन शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. ऑनलाईन पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऑनलाईन लिलाव वेळेत सुरु करता आला नसल्याचे सांगत त्यांनी ऑफलाईन लिलाव सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजता ऑफलाईन लिलावाला सुरूवात झाली. उशीरा का होईना लिलाव सुरु झाल्यामुळे शेतकरी शांत झाले. त्यानंतर ऑफलाईन लिलाव सुरळीत सुरु झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button